मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आता भाजप आणि पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रिंगणात उतरून विरोधकांची मोट बांधण्यात पुढाकार घेताना दिसत आहेत.
राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्याशी आज झालेल्या दुसर्या बैठकीनंतर शरद पवार मंगळवारी 15 विरोधी पक्षांच्या नेत्यांसमवेत बैठक घेतील अशी माहिती आहे.
या बैठकीत राष्ट्रीय मंच या एकाच बॅनरखाली एकत्र येण्याच्या हालचाली सुरु आहेत, या बैठकीत एक आघाडी उभारण्याचा अक्शन प्लान अंतिम टप्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बैठकी बाबत बोलताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शरद पवारांचा हा काही पहिला प्रयत्न नाही.
उद्या विरोधी पक्षांच्या 15 नेत्यांची बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी दिल्लीत संध्याकाळी 4 वाजता होणार असल्याची माहिती आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या बैठकीत कॉंग्रेसचा सहभाग असण्याची शक्यता नाही. दरम्यान शरद पवार यांच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राजधानीत 15 विरोधी पक्षांच्या युतीबाबत पत्रकारांना पटोले यांना विचारले.
त्यावेळी नाना पटोले यांनी म्हटले की, शरद पवारांचा हा काही पहिला प्रयत्न नाही. जेव्हा जेव्हा राजकीय समीकरणे बदलतात, राजकारणात वेगवेगळे वारे वाहत असतात, तेव्हा अशी भूमिका पवार यांनी वारंवार घेत असतात.
त्यामुळे यामध्ये काहीतरी नवीन आहे, असे म्हणणे चुकीचे व घाईचे आहे असे पटोले यांनी म्हटले आहे. आम्ही कोण काय करते याकडे लक्ष देण्याऐवजी पक्ष संघटन वाढविण्याकडे लक्ष दिले असल्याचे सांगितले.
संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर
कोरोना काळात कॉंग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. रक्तदान, ऑक्सिजन पुरवठा, मास्क वितरण, प्लाझ्मा डोनेशन यासारख्या अनेक गोष्टी काँग्रेसनेही केल्या आहेत.
कॉंग्रेसच नाही तर शिवसेनेनेही स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र दोन्ही पक्षाकडून केवळ काँग्रेसला लक्ष्य केले जात आहे. मी सामना वाचत नाही.
आम्ही पक्ष वाढवायचा विचार केला असेल तर कोणाला त्रास का व्हावा? जर कोणी आपल्यावर टीका करत असेल तर आम्ही काळजी करीत नाही.
जयंत पाटील यांनीही शिवसेनेबरोबर युती जाहीर करावी, आमची काहीही हरकत नाही, त्यांनी असे करावे हीच इच्छा आहे, असे नाना पटोले यांनी शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसलाथेट प्रत्युत्तर दिले आहे.