शेतकऱ्यांना दिलासा : खतांचे नवीन दर जाहीर, कोणत्या खताची किंमत किती? जाणून घ्या नवे दर !

260
Fertilizer bag

खरीप हंगाम सुरू व्हायच्या आधी खत उत्पादक कंपन्यांनी खताच्या एका बॅगमागे म्हणजेच 50 किलोच्या बॅगमागे 600 ते 700 रुपये इतकी दरवाढ केल्यामुळे शेतकरी चिंतेत होते.

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी DAP खतांवरील सबसिडीत वाढ केल्याचे जाहीर केले होते, पण पंतप्रधान कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात इतर खतांच्या अनुदानाविषयीचा उल्लेख नव्हता.

त्यामुळे मग फक्त DAP चीच दरवाढ कमी होणार का, असा प्रश्न शेतकरी विचारत होते. आता सरकारने DAP (डाय-अमोनियम फॉस्फेट) सोबतच P&K (फॉस्फेट आणि पोटॅश) खतांसाठीसुद्धा सबसिडी जाहीर केली आहे. त्यामुळे आता सगळ्याच खतांचे दर कमी होणार आहे.

आता आपण सरकारने खतांसाठी जारी केलेले अनुदान आणि कंपन्यांनी जाहीर केलेले खतांचे नवीन सुधारित दर याविषयीची माहिती जाणून घेऊ या !

खतांवरील सबसिडीत वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 19 मे रोजी DAP (डाय अमोनियम फॉस्फेट) या खताच्या एका गोणीवरचं अनुदान 500 रुपयांवरून 1200 रुपयांपर्यंत वाढवले आहे. यामुळे सगळ्याच कंपन्यांची DAP खताची एक बॅग आता शेतकऱ्यांना 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांना मिळणार आहे.

याशिवाय 20 मे रोजी केंद्रीय खते मंत्रालयाने एक नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यानुसार फॉस्फेट आणि पोटॅश खतांसाठी (P&K fertilizer) सबसिडी जाहीर करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या सबसिडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता खतांमध्ये जी दरवाढ झाली होती ती कमी होणार आहे.

केंद्र सरकारकडून राखायनिक खतांवर NBS (Nutrient Based Subsidy) या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते. याचाच अर्थ खतांमधील पोषकद्रव्यांच्या आधारावर म्हणजे त्या खतात किती किलो नायट्रोजन, फॉस्फेट, पोटॅश आणि सल्फर आहे, यानुसार ही सबसिडी दिली जाते.

2020-21मध्ये नायट्रोजनसाठी प्रतिकिलो 18.789 रुपये, फॉस्फेटसाठी प्रतिकिलो 14.888 रुपये, पोटॅशियमसाठी प्रतिकिलो 10.116 रुपये, तर सल्फरसाठी प्रतिकिलो 2.374 रुपये अनुदान निश्चित करण्यात आले होते.

आता 2021-22 च्या खरीप हंगामासाठी नायट्रोजनसाठी प्रतिकिलो 18.789 रुपये, फॉस्फेटसाठी प्रतिकिलो 45.32 रुपये, पोटॅशियमसाठी प्रतिकिलो 10.116 रुपये, तर सल्फरसाठी प्रतिकिलो 2.374 रुपये अनुदान निश्चित करण्यात आले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फॉस्फेटसाठीचे अनुदान 14.888 रुपयांहून 45.32 रुपये करण्यात आले आहे.

खतांचे नवीन दर

भारतात सर्वाधिक वापर यूरिया या खताचा केला जातो. यंदा यूरियाचे दर ‘जैसे थे’ म्हणजेच ठेवण्यात आले होते. यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. म्हणजेच सगळ्या खत उत्पादक कंपन्यांची यूरियाची 45 किलोची एक बॅग शेतकऱ्यांना 266 रुपयांनाच मिळणार आहे.

आता आपण कंपनीनुसार खतांच्या इतर ग्रेड्सच्या किंमती जाणून घेऊया.

इफ्को (Indian Farmers Fertiliser Cooperative Limited) नवीन खतांचे दर जाहीर केलेत. कंपनीने जारी केलेल्या पत्रकानुसार 20 मे 2021पासून या नवीन दराने खतांची विक्री केली जाणार आहे.

याशिवाय कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात असेही म्हटले की, बाजारात उपलब्ध असलेल्या जास्त MRPच्या छापील बॅगासुद्धा नवीन दराने विकण्यात येतील.

म्हणजे सध्या बाजारात इफ्कोची NPK 10-26-26 ची एक बॅग 1775 रुपयांना उपलब्ध आहे, ती आता इथून पुढे 1175 रुपयांना विकली जाईल.

ADVENTZ ग्रूपअंतर्गत येणाऱ्या झुआरी अग्रो केमिकल्स लिमिटेड (जय किसान या ब्रँड नावाने खत विक्री), मंगलोर केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड (जय किसान मंगला या ब्रँड नावाने खत विक्री) आणि प्रदीप फॉस्फेट्स लिमिटेड (जय किसान नवरत्न या ब्रँड नावाने खत विक्री) या तिन्ही कंपन्यांचे त्यांचे नवीन दर जारी केले आहेत.

हे नवीन दर 20 मे 2021 पासून लागू करण्यात आले आहेत. तसेच या कंपन्यांनी जारी केलेल्या पत्रकात हेसुद्धा स्पष्ट केले आहे की, या कंपन्यांच्या बाजारात उपलब्ध असलेल्या जास्त MRPच्या छापील बॅगासुद्धा नवीन दराने विकण्यात येतील.

कोरोमंडल ही खत उत्पादक कंपनी ग्रोमोर या ब्रँड नावाने खताची विक्री करते. कंपनीने 20 मे 2021 पासून नवीन दर लागू केले आहेत.

जुना स्टॉक किंवा खताचे पोते ज्यावर जास्तीची म्हणजेच दरवाढ झाली तेव्हाची एमआरपी असेल तोसुद्धा या नवीन दरानेच विकावा, असेही सांगितले आहे.

स्मार्टकेम टेक्नोलॉजीज लिमिटेड ही कंपनी ‘महाधन’ या ब्रँडखाली खंतांची विक्री करते. 20 मे पासून खतांची नवीन दराने विक्री होणार आहे.

तक्रार कुठे करायची?

जर तुमच्या भागात एखादा विक्रेता पूर्वीच्या ज्यादा दरानेच खत विकत असेल तर तुम्ही फोनद्वारे यासंबंधीची तक्रार करता येणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष सुरू केला आहे.

याविषयी माहिती देताना कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले, कोरोना रोखण्यासाठी असलेल्या निर्बंधकाळात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे, निविष्ठांचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि त्यामध्ये काही अडचण आल्यास त्याच्या निवारणासाठी नियंत्रण दिलेल्या निर्देशानुसार कृषी आयुक्तालयस्तरवर नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाला आहे.

त्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 8446117500 तसेच कृषि विभागचा टोल फ्री क्रमांक 18002334000 उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कोणतीही तक्रार असेल तर वरील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here