ठाणे: अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना, असं वादग्रस्त विधान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. आव्हाड यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुंब्रा येथील एका नगरसेविकेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी नागरिकांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त आवाहन केले.
कोरोनाचे संकट येणार हे अल्लाहला 2011 सालीच दिसले म्हणून 2019ला कब्रस्तान बनले, असे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे विधान करून मुस्लिम समाजाला खुश करण्याचे राजकारण आव्हाड यांनी केल्याचे व्हिडिओवरून दिसत आहे.
अल्लाह को मालूम था 2011 में कोरोना आनेवाला है. तभी मुंब्रा में 2019 में कब्रस्तान बना, असे वादग्रस्त वक्तव्य आव्हाड यांनी केले आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आव्हाड हे गेल्या अनेक वर्षांपासून मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत. मात्र, आता कोरोनाच्या संकटातील आपले यश – अपयश झाकण्यासाठी त्यांनी थेट अल्लाचाच आधार घेतल्याची टीका होऊ लागली आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर आव्हाड यांनी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.
तुम्ही म्हणता जे काही होतं ते अल्लाच करतो. हे कब्रस्तानही अल्लानेच बनवले आहे, असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. आव्हाड यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.