मुंबई : औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद रंगलेला असताना आता उस्मानाबादच्या नामांतराचा मुद्दाही कळीचा ठरण्याची शक्यता आहे.
उस्मानाबादमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवर त्याची माहिती देताना ‘धाराशिव-उस्मानाबाद’ उल्लेख करण्यात केला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादशी संदर्भात निर्णय झाला तेव्हा त्याची माहिती देताना सीएमओच्या ट्वीटमध्ये संभाजीनगर असा उल्लेख होता, तर काल उस्मानाबादबाबत निर्णय झाला त्यावेळी धाराशिव असा उल्लेख करण्यात आला.
प्रसिद्धीपत्रकात उस्मानाबाद असाचा उल्लेख होता. परंतु सीएमओच्या ट्विटर हॅण्डलवर धाराशिव-उस्मानाबाद असा उल्लेख केला आणि चर्चेला सुरुवात झाली.
याआधी मुख्यमंत्री कार्यालयाकडून संभाजीनगर औरंगाबाद असा उल्लेख करण्यात आला होता. तेव्हा काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला होता.
मुख्यमंत्री कार्यालयाने काँग्रेसचा आक्षेप झुगारुन औरंगाबाद शब्दही टाळला आणि केवळ संभाजीनगर अशा उल्लेख केला. आता धाराशिव-उस्मानाबादबाबत काँग्रेस काय भूमिका घेते याकडे लक्ष आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी काय भूमिका घेणार?
नामांतर हा महाविकास आघाडीमधील किमान समान कार्यक्रम नाही, अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होईल त्यात या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
शिवसेना नामांतरासाठी आग्रही
मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन औरंगाबादचा संभाजीनगर आणि उस्मानाबादचा धाराशिव असा केला आहे. त्यामुळे शिवसेनेने आपली नामांतराची भूमिका लावून धरल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे.
औरंगाबाद असो कि उस्मानाबाद महाविकास आघाडीचा समान कार्यक्रम नसल्याची प्रतिक्रिया सर्व कॉंग्रेस नेते देत असले तरी सेना मात्र संभाजीनगर, धाराशिव असा उल्लेख करीत आहे.