देवणी तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तो रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनीही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे तहसीलदार सुरेश घोळवे म्हणाले.
दरम्यान, गुरुवारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १२ जणांची चाचणी करण्यात आली असता त्यात ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गृहविलगीकरणातील काहीजण घरी न थांबता बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. परिणामी, गृह विलगीकरणातील प्रत्येक कोरोना बाधितांच्या प्रत्यक्षात घरी जाऊन तलाठी, ग्रामसेवक, आशा कार्यकर्ती, पोलीस कर्मचारी यांचे संयुक्त पथक तपासणी करणार आहे.
होम आयसोलेशन नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्याकडून १ हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल तसेच त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल, असे ही तहसीलदार सुरेश घोळवे यांनी सांगितले.