नालासोपारा : वसईतील एका नामवंत हॉस्पिटलमधील विकृत कर्मचाऱ्याने कोरोना पॉझिटिव्ह महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढल्यानं एकच खळबळ उडाली.
विशेष म्हणजे ते फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत त्यानं 10 लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
कोरोना पॉझिटिव्ह 41 वर्षीय महिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाली होती. ती बेशुद्धावस्थेत असताना तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढण्यात आले.
याबाबत पीडित महिलेच्या तक्रारीवरून माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फोटोतील हाताचे बोट आणि हातावरील तीळ यावरून अवघ्या 12 तासांत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकण्यात यश मिळविले. आज गुरुवार 10 रोजी वसई न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
योगेश वाघ (वय 19) असे आरोपीचे नाव आहे. कोरोनाच्या काळात हा आरोपी तात्पुरत्या स्वरूपात वसईतील एका नामवंत रुग्णालयात काम करीत होता. वसईतील 41 वर्षीय पीडित महिला ही 23 ऑक्टोबर रोजी कोरोना पॉझिटिव्ह म्हणून रुग्णालयात दाखल झाली होती.
तिला श्वसनाचा तीव्र त्रास जाणवत असल्याने तिची प्रकृती गंभीर झाली होती. पुढचे 2 दिवस पीडित महिलेवर बेशुद्धावस्थेत रुग्णालयात उपचार सुरू होते. महिला दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. 24 ऑक्टोबर रोजीच्या रात्री या आरोपीने पीडित महिलेच्या अंगावरील कपडे बाजूला सारून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढले होते.
फोटोमध्ये आरोपीचा हाताचा पंजा दिसत होता. महिला बरी होऊन घरी गेल्यानंतर दि.7 डिसेंबर रोजी या आरोपीने त्याच हॉस्पिटलमधील एका नर्सचा व्हॉट्सअप हॅक करून आपल्या मोबाईलमधील फोटो आणि व्हिडीओ पीडित महिलेच्या व्हॉट्सऍपवर टाकले.
मला 10 लाख रुपये दे अन्यथा हे फोटो आणि व्हिडीओ व्हॉट्सऍपसारख्या सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी तो देत होता. तसेच पोलिसांना ही सांगायचे नाही, अशी धमकी त्याने दिली होती.
पीडित महिलेने हा सर्वप्रकार पाहून तिने संबंधित रुग्णालय गाठून याची चौकशी केली, पोलिसांना सांगून याबाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात विनयभंग, खंडणी, धमकी, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करणे याप्रकरणी दि.8 डिसेंबर रोजी रात्री 12 च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला होता.
माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपासाला सुरुवात केली. घटनेच्या वेळी जेवढे कर्मचारी संबंधित रुग्णालयात कामावर होते, त्यांची पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी सुरू केली, सर्वांच्या हाताचे फोटो घेतले, त्या फोटोत एका कर्मचाऱ्याचा हात, हातावरील तीळ हा संशयास्पद वाटला.
त्याला बाजूला घेऊन त्याच्या मोबाईलमधील डाटा रिकव्हर केला असता, त्याच्या मोबाईलमध्ये संबंधित फोटो आणि व्हिडीओ मिळताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला अटक करून आज वसई न्यायालयात हजर केले असता दि.14 डिसेंबरपर्यंत 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली.
या गुन्ह्याच्या तपासासाठी महाराष्ट्र सायबर सेलचे स्वतंत्र पथक पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले असून, या आरोपीने आतापर्यंत कामावर असताना आणखी किती महिलांचे असे फोटो काढले आहेत, कुठे व्हायरल केले आहेत, कुणाकडून अशा प्रकारे खंडणी घेतली आहे का? त्याचा सर्व मोबाईलमधील डिलीट केलेला डाटा रिकव्हर करून तपास करत असल्याचे तपासाधिकारी यांनी सांगितले आहे.