अलीगड : कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे गेल्या काही दिवसांत अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या किमान 44 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यात 19 प्राध्यापकांचा समावेश आहे.
उर्वरित 25 शिक्षकेतर कर्मचारी आहेत. एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था म्हणून ओळखले जाणाऱ्या विद्यापीठात पुढील काही दिवसांत अजून काही कर्मचारी कोरोना बाधित असण्याची भीती वर्तविली जात आहे.
अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू तारिक मन्सूर यांनी यासंदर्भात आयसीएमआरला पत्र लिहिले आहे. हा मृत्यू प्राणघातक नवीन व्हेरींअंट मुळे झाला असावा अशी शक्यता वर्तवत त्यांनी पुढील तपासणीसाठी बोलविले असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
अलीगड मुस्लिम विद्यापीठ व त्याच्या आसपासच्या सिव्हिल लाइन्स भागात जीवघेणा विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय बळकट होत आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, चाचणीचे नमुने तपासणीसाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेकडे (CSIR) पाठविण्यात आले आहेत.
विद्यापीठाची स्मशानभूमी आता भरली असून ही मोठी शोकांतिका आहे. अनेक डॉक्टर, ज्येष्ठ प्राध्यापक मरण पावले आहेत. यात डीन, अध्यक्ष यांचा समावेश होता. निरोगी आणि तंदुरुस्त असलेले बरेच तरुणही मरण पावले, अशी माहिती राज्यशास्त्र विषयातील प्राध्यापक डॉ.आरशी खान यांनी दिली आहे.