नवी दिल्ली : देशात कोरोनाने मृत्यूंचे भय काही संपत नाही. देशातील रोजच्या रुग्णसंख्येच्या आकड्याने शुक्रवारी पुन्हा एकदा ४ लाखांचा टप्पा पार केला. तर एका दिवसात ३,९१५ जणांचा मृत्यू झाला. गंभीर बाब म्हणजे गेल्या दहा दिवसांपासून देशात रोज ३ हजारांवर मृत्यू होत आहेत.
गुरुवारपर्यंत संपलेल्या दहा दिवसांत देशात एकूण ३६ हजार ११० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचाच अर्थ गेल्या १० दिवसांत देशात प्रत्येक तासाला सरासरी १५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
गेल्या १० दिवसांत भारतात इतर देशांच्या तुलनेत सर्वांधिक मृत्यू झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत दहा दिवसांत ३४ हजार ७९८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर ब्राझिलमध्ये दहा दिवसांत ३२ हजार ६९२ लोकांचा बळी गेला होता. मेक्सिकोत दहा दिवसांत १३ हजार ८९७ आणि ब्रिटनमध्ये १३ हजार २६६ जणांचा मृत्यू झाला होता.
गुरुवारी संपलेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ८५३ मृत्यूंची नोंद झाली होती. तर उत्तर प्रदेश, दिल्ली आणि कर्नाटकात सुमारे ३०० जणांचा मृत्यू झाला. तर शुक्रवारी सलग सतराव्या दिवशी देशात ३ लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ४ लाख १४ हजार १८८ नवे रुग्ण आढळून आले, तर ३ हजार ९१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील मृतांचा एकूण आकडा २ लाख ३४ हजार ८३ वर पोहोचला आहे.
देशात आतापर्यंत २ कोटी १४ लाख ९१ हजार ५९८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील १ कोटी ७६ लाख १२ हजार ३५१ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात ३६ लाख ४५ हजार १६४ सक्रिय रुग्ण आहेत.