महाराष्ट्राभोवतीचा करोनाचा फास घट्ट होतोय | पुढील दोन आठवड्यात दिवसाला १००० जणांचा मृत्यू होणार?

193
coronavirus-cases-in-india-

महाराष्ट्रामधील करोनाबाधितांची संख्या पुढील दोन आठवड्यांमध्ये वेगाने वाढणार असल्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. चार एप्रिलपर्यंत राज्यातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या तीन लाखांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

यामध्ये सर्वाधिक रुग्णवाढ ही पुणे, नागपूर आणि मुंबईमध्ये असेल असं सांगण्यात येत आहे. पुण्यामध्ये ६१ हजार १२५, नागपूरमध्ये ४७ हजार ७०७ तर मुंबईत ३२ हजार ९२७ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य सेवा अपुऱ्या पडतील असेही सांगितले जात आहे. नागपूर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवांची संख्या वाढवणे गरजेचे आहे असेही सांगण्यात आले आहे. तसेच पुढील ११ दिवसांमध्ये मृतांची संख्या ६४ हजारांचा टप्पा ओलांडेल अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रामध्ये बुधवारी ३१ हजार ८५५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यात रुग्ण आढळून आलेत.

राज्यामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या सध्या २५ लाख ६४ हजार ८८१ इतकी आहे. त्यापैकी दोन लाख ४७ हजार २९९ रुग्ण हे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण म्हणजेच उपचार सुरु असणारे रुग्ण आहेत.

राज्यामध्ये सध्या मृतांची संख्या ५३ हजार ६८४ इतकी आहे. बुधवारी राज्यामध्ये ९५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनावर मात करुन ठणठणीत झालेल्या, ताप नसलेल्या आणि शरीरामधील ऑक्सिजनचं प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत असणाऱ्यांना कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरित करण्यात यावे असे मत तज्ञांनी मांडले आहे.

तसेच दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची दर चार तासांनी सहा मिनिटांची चालण्याची चाचणी, ऑक्सिजनचे प्रमाण तपासून पाहणं यासारख्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजेत अस मतही व्यास यांनी व्यक्त केलं आहे.

राज्यातील आरोग्य विभागाने सध्या ज्या वेगाने करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे त्याच्या आधारे ही भविष्यातील आकडेवारीसंदर्भातील शक्यता व्यक्त केलीय.

मागील तीन ते चार दिवसांमध्ये राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाखांनी वाढली आहे. सध्या एकूण अ‍ॅक्टीव्ह रुग्णांपैकी ४१ टक्के रुग्ण रुग्णालयामध्ये आहेत. त्यापैकी ८ टक्के गंभीर तर ०.७१ टक्के रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत.

करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण आठवड्याला एका टक्क्याने वाढत असल्याचं सर्व जिल्ह्यांमधून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होतं आहे. याच आकडेवारीच्या आधारे राज्याच्या आरोग्य विभागाने हा अंदाज व्यक्त केला आहे.

संकलित करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे मृत्यू दर हा २.२७ टक्के असल्याचं सांगण्यात आलं आहे. याच दराच्या आधारे पुढील दोन आठवड्यांमध्ये राज्यामधील एकूण करोना रुग्णांची संख्या २८ लाख २४ हजार ३८२ इतकी होईल.

मृतांचा आकडा हा ६४ हजार ६१३ पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. म्हणजेच महाराष्ट्रात पुढील दोन आठवड्यांमध्ये करोनामुळे दिवसाला एक हजार जणांचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.

राज्यामध्ये बेड्सची संख्या, आयसीयू बेड्स आणि व्हेटिंलेटर्सची संख्या पुरेशी असली तरी ऑक्सिजन सेवा असणाऱ्या बेड्सची संख्या चार हजारांनी वाढवण्याची गरज आरोग्य विभागाने व्यक्त केलीय.

पुढील काही दिवसांमध्ये ठाणे आणि नागपूर या दोन जिल्ह्यांमधील बेडची संख्या वाढवली नाही तर परिस्थिती गंभीर होईल अशी भीती राज्यातील आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी व्यक्त केली आहे.

ठाण्याचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यामध्ये करोना रुग्णांसाठी तीन हजार अतिरिक्त बेड्सची सोय पुढील चार दिवसांमध्ये केली जाणार असल्याचे सांगितले आहे.

नागपुरचे आयुक्त राधाकृष्ण बी यांनी खासगी रुग्णालयांमध्ये पुढील दोन दिवसांमध्ये अडीचशे बेड्स वाढवले जाणार असल्याची माहिती दिली. तसेच सरकारी आरोग्य महाविद्यालयामध्ये ९० तर सरकारी रुग्णालयामध्ये ४५ बेड्स वाढवण्यात येणार असल्याचं राधाकृष्ण बी यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here