Coronavirus And 5G Testing | देशात 5G नेटवर्कच्या चाचणीमुळं कोरोनाचा कहर आणि मृत्यूंची संख्या वाढतेय? जाणून घ्या खरे कारण !

587
http://digitallymarathi.com/5g-side-effects-ban-on-testing-petition-filed-in-the-supreme-court-seeking-a-ban-on-5g-testing/

देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली असताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये वेगाने वाढणाऱ्या कोरोना संक्रमणासाठी ५ जी टेस्टिंगशी जोडलेला दावा सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

या मेसेजमध्ये दावा केलाय की, भारतात सध्या कोरोना व्हायरसची दुसरी लाट पसरली आहे. यात जितक्या संख्येने मृत्यू होत आहेत. त्यासाठी कोणताही आजार कारणीभूत नाही तर ५ जी टॉवरच्या टेस्टिंगमुळे निर्माण होणाऱ्या रेडिएशन जबाबदार आहेत असे म्हटले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दाव्याबद्दल आता स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मोबाईल आणि इंटरनेट सेवा कंपन्यांचे व्यासपीठ असलेले सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने सोशल मीडियात व्हायरल होणारा दावा चुकीचा आणि खोटा असल्याचं म्हटले आहे.

सीओएआयने देशात कोविड १९ महामारीच्या लाटेमागे 5G तंत्रज्ञानाबद्दल चुकीची अफवा पसरवत असल्याची चिंता व्यक्त केली आहे. सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की, सोशल मीडियावरील काही मेसेज आणि काही वृत्तपत्रात ५ जी स्पेक्ट्रम चाचणीमुळे देशात कोरोना झपाट्याने पसरत असल्याचा दावा केला आहे, पण हे पूर्णपणे चुकीचे आणि निराधार असून यात काहीही तथ्य नाही.

अशाप्रकारच्या चुकीच्या दाव्यावर विश्वास ठेऊ नये. जगातील अनेक देशात ५ जी नेटवर्कची सुरुवात याआधीच झाली आहे. लोक सुरक्षितपणे या सुविधांचा वापर करत आहेत. इतकेच नाही तर ५ जी नेटवर्क आणि कोविड १९ यात कोणताही संबंध नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही स्पष्ट केलं असल्याचे सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक एस. पी कोच्चर यांनी सांगितले.

पीआयबी फॅक्ट चेकनेही या व्हायरल होणाऱ्या मेसेजवर भाष्य केले आहे. पीआयबीने ट्विट केले आहे की, अनेक राज्यात ५ जी नेटवर्कची चाचणी करण्यात येत आहे. ज्या कारणामुळे लोकांचा मृत्यू होतोय आणि त्याला कोविड १९ आजाराचं नाव दिले जात आहे. हा दावा खोटा आहे. कृपया अशा व्हायरल मेसेजच्या माध्यमातून गैरसमज निर्माण करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here