कोरोना प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी विविध राज्यांमध्ये लॉकडाऊन, संचारबंदी असे उपाय योजले गेले असले तरी अद्यापही संसर्गावर नियंत्रण आल्याचे दिसत नाही.
नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे देशातील परिस्थिती (Corona India Situation) अतिशय बिकट असून दररोज कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे.
कोरोना प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी विविध राज्यांमध्ये लॉकडाऊन, संचारबंदी असे उपाय योजले गेले असले तरी अद्यापही संसर्गावर नियंत्रण आल्याचे दिसत नाही. काही राज्यांमधील रुग्णसंख्या काहीशी घटली असली तरी मृतांची संख्या मात्र वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
देशात सलग तिसऱ्या दिवशी 24 तासात चार लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात देशात 4,01,078 रुग्णांची नोंद झाली. याअगोदर पाच मे रोजी 4.12 लाख आणि 6 मे रोजी 4.14 लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.
मृतांची आकडेवारी वाढतच असून देशात गेल्या 24 तासात पहिल्यांदाच 4,187 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. दिलासादायक बाब म्हणजे 03,18,609 रुग्ण कोरोनातून बरेही झाले आहेत.
मुंबईत कोरोनाचा वेग मंदावला
सर्वाधित रुग्ण सापडत असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णसंख्येला चांगलाच ब्रेक लागला आहे. शहरातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 50 हजारांच्या खाली आली आहे. गेल्या 24 तासांत 33378 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
कोरोनाचे नवे 2,678 रुग्ण सापडले असून सातत्याने रुग्णसंख्या कमी होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय 3678 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात कोरोनामुळे 62 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 48484 सक्रिय रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 53 हजार 605 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 864 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 50 लाख 53 हजार 336 एवढी झाली आहे. तसेच आज 82 हजार 266 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 43 लाख 47 हजार 592 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.