कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यांच्यातील लक्षणे वेगवेगळी आहेत. काही कोरोना रुग्णांमध्ये सौम्य, काही जणांमध्ये मध्यम तर काही जणांमध्ये तीव्र लक्षणे दिसत आहेत.
काही रुग्णांमध्ये तर लक्षणेच दिसत नाही आहेत. कोरोना रुग्णांमधील लक्षणांनुसार त्यांच्यावर उपचार केले जात आहे. आता या उपचाराची (Coronavirus treatment) दिशा ठरवण्यासाठी लघवीची तपासणीही (Urine analysis) महत्त्वाची ठरू शकते, असे संशोधनात दिसून आले आहे.
कोरोनाबाधित (Corona) रुग्णाच्या मूत्राचे नमुने (Urine Samples) आजाराच्या तीव्रतेचा अंदाज घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात आणि यातून रोगाची तीव्रता समजू शकते, असे संशोधकांनी म्हटलं आहे.
अमेरिकेतील डेट्रॉईटमधील वेन स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अभ्यासात संसर्ग नसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीच्या (Immunity Power) विशिष्ट बायोमार्कर्सची (Biomarkers) पातळी वाढल्याचे दिसून आलं आहे. या व्यतिरिक्त उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या कोमॉर्बिड रुग्णांमध्ये या इन्फ्लेमेटरीचे प्रमाण अधिक होते.
कोविड-19 चे (Covid-19) बायोमार्कर्स कोणकोणत्या व्यक्तींमध्ये विपुल प्रमाणात रोगप्रतिकारक प्रतिक्रिया विकसित करतात याचा अंदाज घेता येईल का या आशेने अभ्यास केल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.
याला सायटोकिन स्ट्रॉम (Cytokine Storm) असे देखील म्हटले जाते. यासाठी संशोधकांनी कोरोनाबाधित रुग्णाची मूत्र तपासणी करण्याचं ठरवले. कारण यामुळे दुखापत करण्याची म्हणजेच सुई किंवा रक्ताचे नमुने घेण्याची गरज नसते.
शास्त्रज्ञांनी सांगितले की, आम्हाला आशा आहे की कोविड-19 च्या रुग्णांसाठी नियमित चाचणी प्रक्रियेत या तपासणीचा समावेश झाला तर आजार किती गंभीर पातळीवर जाईल याचा अंदाज बांधून संभाव्य उपचारांची रणनीती आखता येईल. अमेरिकन फिजिओलॉजीकल सोसायटीच्या प्रायोगिक जीवशास्त्र 2021 या वार्षिक बैठकीत हे निष्कर्ष सादर केले जातील.
दरम्यान एका वेगळ्या अभ्यासानुसार, आस्ट्रेलियन संशोधकांनी SARS-Cov-2 विषाणूला प्री क्लिनिकल मॉडेलमध्ये पेशींमध्ये प्रवेश करण्यापासून रोखणारी नॅनोबॉडी (Nano Body) शोधून काढली आहे. कोविड-19 वर या नॅनोबॉडीच्या आधारे तपासणी, उपचारांचा एक आगाऊ मार्ग देखील तयार करता येईल.
नॅनो बॉडीज- टाईन इम्युन प्रथिन (Tine Immune Protein) ही कोविड-19 साठीच्या पारंपारिक अँटिबॉडी उपचारांवर पर्याय ठरू शकतात. या नॅनो बॉडीजच्या मॅपिंगमुळे ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियायेथील डब्ल्यूयूईआयआय येथील सहयोगी प्राध्यापक वाई-हॉंग थाम यांच्या नेतृत्वातील संशोधक पथकाला SARS-Cov-2 विषाणूच्या नॅनो बॉडीजची ओळख पटली आहे.
या नॅनो बॉडीने SARS-Cov-2 या विषाणूला (जो कोरोनाला कारणीभूत आहे) देखील ओळखलं आहे. यामुळे मानवाला विषाणू विरोधात क्रॉस प्रोटेक्शन मिळू शकतं.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये सज्जतेबाबत खूप चर्चा होताना दिसते. या नॅनो बॉडीज SARS-CoV-2, SARS-CoV, MERS या सारख्या अन्य मानवी बीटा-कोरोनाव्हायरसला रोखण्यात भविष्यात प्रभावीपणे सिद्ध होऊ शकतात,असं थाम यांनी सांगितलं.
पीएनएएस या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, या पथकाने अल्पाकस या दक्षिण अमेरिकेतील प्राण्यांवर या अनुषंगाने प्रयोग सुरू केले असून, या नॅनो बॉडीजची निर्मिती नैसर्गिकपणे व्हावी, असा त्यांचा यामागील उद्देश आहे.