नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्व विक्रम मोडीत काढत प्रशासनाची चिंता वाढवली असताना आता धोका आणखी वाढला आहे.
कोरोनाच्या डबल म्युटंट व्हेरियंटमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. शास्त्रीय भाषेत हा व्हेरिएंट B.1.167 म्हणून ओळखला जातो.
या व्हेरिएंटला रोखण्याचा मार्ग अद्याप तरी सापडलेला नाही. त्यात आता या व्हेरिएंटचं आणखी एक म्युटेशन झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास संपूर्ण देशाची चिंता वाढणार आहे.
डबल म्युटंट व्हेरिएंटमध्ये आणखी एक म्युटेशन झाल्याने त्याचे रुपांतर ट्रिपल म्युटंटमध्ये झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाला देण्यात आल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
डबल म्युटंट व्हेरिएंटच्या स्पाईक प्रोटिनमध्ये तिसरं म्युटेशन झाले आहे. महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, छत्तीसगडमधून घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये नवे म्युटेशन दिसून आले आहे. सध्या या राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, छत्तीसगडमधून घेण्यात आलेल्या १७ नमुन्यांमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
डबल म्युटंट व्हेरिएंटमुळेच या राज्यांमधील कोरोना रुग्णांचा आकडा वेगाने वाढल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यातच आता ट्रिपल व्हेरिएंट समोर आल्याने चिंता आणखी वाढली आहे.
डबल म्युटेंट व्हेरिएंट आधीपेक्षा जास्त धोकादायक
नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोलने (NCDC) काही महिन्यांपूर्वीच डबल म्युटंट व्हेरिएंटची माहिती दिली होती. या व्हेरिएंटला शास्त्रज्ञांनी B.1.167 नाव दिले होते.
-
यामध्ये दोन प्रकारचे (E484Q आणि L452R) म्युटेशन्स आहेत. हा कोरोनाचा असा विषाणू आहे, ज्यामध्ये दोनवेळा बदल झाला आहे. विषाणू स्वत:ला दीर्घकाळ प्रभावी ठेवण्यासाठी सातत्याने स्वत:च्या रचनेत बदल करतो.
स्वत:चा बचाव करण्यासाठी विषाणू परिस्थितीनुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणतो. त्यालाच म्युटेशन असे म्हटले जाते.
कोरोना विषाणूचा दुसरा म्युटंट व्हेरिएंट धोकादायक मानला जात होता. त्यात आता ट्रिपल म्युटंट आढळून आल्याच्या शक्यतेने चिंतेत भर पडली आहे.