पिंपरी : कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. राज्यातील विविध भागात कोरोनाच्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा अपुरा पडताना दिसत आहे. त्यातच आता रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
पोलीस यावर धडक कारवाई करत असले तरी काही प्रमाणात हा काळाबाजार अद्यापही सुरूच आहे. आता रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवडच्या नगरसेविकेच्या मुलाचे नाव समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अपक्ष नगरसेविका साधना मळेकर यांच्या 20 वर्षीय मुलाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. वैभव मळेकर असे या मुलाचे नाव आहे.
त्याच्याकडे पोलिसांना 2 रेमडेसिवीर इंजेक्शन सापडली. त्यानंतर त्याला अटक केली गेली आहे. आता पोलिसांनी ही इंजेक्शन ताब्यात घेतली आहेत.
पुणे पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी वेगवेगळ्या तीन गुन्ह्यात 5 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडुन 6 इंजेक्शन ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी खडकी, अलंकार आणि डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खडकी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात शुभम आरवडे आणि वैभव मळेकर यांना अटक केली आहे.
दरम्यान, ही सर्व इंजेक्शन अवैधरित्या मिळवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मूळ किंमतीपेक्षा जास्त किंमतीत विकली जातात. ही औषधं मिळाली कशी याबद्दल पोलिसांकडून याची सखोल चौकशी केली जात आहे.