सावत्र बापाने चार वर्षांचा सावत्र भाऊ आणि आईचा खून केला असल्याची फिर्याद एका महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात दिली आहे. आई आणि मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
ही घटना 6 जानेवारी रोजी वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली असून शनिवारी (दि. 9) उघडकीस आली आहे.
सुमय्या नासिर शेख (वय 41), आयान नासिर शेख (वय 4) असे खून झालेल्या माय लेकरांची नावे आहेत.
नोमान उर्फ सोमेश्वर काळे (वय 40) असे गुन्हा दाखल झालेल्या नराधम बापाचे नाव आहे. याबाबत सुमय्या यांच्या मुलीने रविवारी (दि. 10) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेचा सावत्र बाप आहे. आरोपी बाप फिर्यादी यांच्या मयत सावत्र भाऊ आयान याला घरातून घेऊन गेला.
तसेच आरोपी आपल्या सावत्र मुलीकडे (फिर्यादी) वाईट नजरेने बघत असल्याने त्यांनी त्याला घरात राहू दिले नाही. या कारणावरून त्याने फिर्यादी यांची आई सुमय्या आणि भाऊ आयान यांच्यावर हत्याराने वार करून निर्घृणपणे खून केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
वाल्हेकरवाडी येथील मोरया कॉलनीमध्ये एका बंद खोलीतून उग्र वास येत असल्याची माहिती शनिवारी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
त्यावेळी बंद खोलीत माय लेकरांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आले. पोलिसांना घटनास्थळावर रक्ताने माखलेला चाकू, बियरच्या बाटल्या आणि बिस्कीटचे पुडे आढळले आहेत. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.