वाळूज महानगर : लग्नाचे आमीष दाखवून १७ वर्षांच्या मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला. या प्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
हेमंत अंकुश पुंड (वय २३, रा. अयोध्यानगर, वाळूज महानगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पॉस्को, एट्रासिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी ३१ जानेवारी रोजी दिली होती. या प्रकरणाचा तपास करताना हेमंत पुंडने तिला पळवून नेल्याची माहिती मिळाली.
तो त्या मुलीसह वेगवेगळ्या ठिकाणी राहात असून, तो सध्या पुण्यात असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक सतीश पंडित यांना मिळाली. त्यावरून त्यांनी व महिला कर्मचाऱ्यांनी पुण्यात जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.
पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक सतीश पंडित पुढील तपास करत आहेत.