चंद्रपूर : आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी यांनी आज (30 नोव्हेंबर)आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं.
वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. नातेसंबंध आणि महारोगी सेवा समितीमधील कलहाचा त्रास सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी असंही सांगितलं जात आहे.
अधिक वाचा : आमटे कुटुंबीयांमधील वाद का चिघळला? शीतल आमटे यांच्या आत्महत्येने पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला आहे!
काही दिवसांपूर्वी डॉ. शीतल आमटे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन महारोगी सेवा समितीच्या कार्यकर्त्यांवर, विश्वस्तांवर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली होती. परंतु दबावामुळे त्यांनी एक दोन तासात हा व्हिडीओ हटवला.
मात्र यानंतर डॉ. विकास आमटे, प्रकाश आमटे, मंदा आमटे आणि भारती आमटे यांनी पत्र काढून त्यांचे आरोप फेटाळले होते. त्यांची मानसिक आरोग्य फारचं ठीक नसून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
डॉ. शीतल आमटे या ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय. बाबा आमटे यांच्या नात होत्या. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या.
मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला.
हा अंतर्गत गृहकलह सुरु असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले. विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले पण त्या आधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.
डॉ. शीतल आमटे यांनी महत्त्वाचं म्हणजे डिप्रेशनमध्ये बाहेर कसं पडावं यावरही त्यांनी व्हिडीओ बनवला होता. त्यामुळे त्यांच्या आत्महत्मेचं वृत्त अतिशय धक्कादायक आहे.