पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आला. रस्त्यात अडवून 5 जणांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. हा प्रकार जांभुळवाडी येथे घडला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
किरण कैलास इंगळे (वय 22), शेखर अंकुश दिघे (वय 20) आणि जय पांडुरंग निकम (वय 21, तिघे रा. विठ्ठलनगर, जांभुळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
भाऊ चोरघे आणि रवी इंगळे यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अजित ओंबासे (वय 34, रा. आंबेगाव खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ अमर ओंबासे हा दुचाकीवरुन रविवारी पहाटे मार्केटयार्ड येथे कामाला जात होता. त्यावेळी जांभुळवाडी रोडवरील लिपाणे वस्ती येथे पाच जण कारमधून आले.
त्यांनी अमर याच्या दुचाकीला धडक देऊन खाली पाडले. अमर हा एका महिलेबरोबर बोलत असल्याच्या संशयावरुन आरोपींनी त्याला शिवीगाळ करुन कोयत्याने डोक्यात, दोन्ही हाताचे मनगटावर, पाठीवर सपासप वार केले.
त्यात अमर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे करीत आहेत.