उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हैबतपुर येथील एका खून प्रकरणामुळे उदगीर शहरात दगडफेक झाली होती. त्यामुळे शहरात वातावरण तणावपूर्ण निर्माण झाले होते.
हैबतपूर प्रकरणाचा तपास अजून व्हायचा आहे, त्यानंतर अजून एक धक्कादायक खुनाचा गुन्हा घडला आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीस ठाणे पुन्हा चर्चेत आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पहाटेच्या सुमारास पायी वाकिंगला जाणाऱ्या नागरिकांना एक युवक मृत अवस्थेत पुलाखाली पडला असल्याचे आढळून आले.
त्यानंतर काही नागरिकांनी ग्रामीण पोलिसांना फोनवर या घटनेची माहिती दिली. तेव्हा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक घारगे त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
या मयताची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. या भागातील सीसीटीवी फुटेज तपासल्यानंतर उमेश मुरलीधर उखंडे (वय-४०) रा सोनार गल्ली, भालकी (कर्नाटक) या इसमाचा खून झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन, ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज आधारे घटनास्थळाच्या शेजारील लॉजचा कर्मचारी युवराज पाटील यास ताब्यात घेतले आहे.
कमरेच्या बेल्टने मारहाण झाल्याने या इसमाचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या मयताचे प्रेत येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी बीट अंमलदार श्री रंगवाळ, डीबी पथकाचे नामदेव सारूळे, चंद्रकांत कलमे, तुळशीदास बरूरे, राहुल गायकवाड आदींनी पुढाकार घेतला आहे.