काय आहे प्रकरण ? बाळ बोठे याच्या विरोधात विनयभंगाचाही गुन्हा दाखल

198

नगर येथील बहुचर्चित रेखा जरे खून प्रकरणात फरारी असलेला मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, एका विवाहित तरूणीने नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात आज फिर्याद दिली असून बोठे याने वेळोवेळी आपला विनयभंग केल्याचे त्यामध्ये म्हटले आहे.

तक्रारीत नमूद केलेल्या घटना ह्या ३० नोव्हेंबरपूर्वीच्या ( रेखा जरे यांच्या खुनाच्या आधीच्या ) आहेत. सप्टेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२० याकाळात बाळ बोठे याने वेळोवेळी आपला विनयभंग केल्याचे सदर महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

शहरातील एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा त्याच्याविरूद्ध दाखल करण्यात आला आहे. एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेच्या सूनेने कोतवाली पोलीस ठाण्यात ही फिर्याद दिली असून पोलिसांनी बोठेविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीत नमूद केल्यानुसार, ‘ सासूशी ओळख असल्याने असल्याने बोठेचे आमच्या घरी येणे जाणे असे. घरी आल्यावर सासूशी बोलत असताना आपल्याबद्दल अश्लील शेरेबाजी करणे, हावभाव करणे, स्पर्श करणे तसेच मोबाइलवर संपर्क साधून पाठलाग करणे ‘ अशी कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कोतवाली पोलिसांनी बोठेविरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

३० नोव्हेंबर रोजी नगर-पुणे रोडवरील जातेगाव घाटात जरे यांचा गळा चिरून खून झाला. हा खून बोठे याने सुपारी देऊन घडवून आणल्याचा आरोप आहे. तसा गुन्हा बोठेविरूद्ध पारनेर तालुक्यातील सुपे पोलीस ठाण्यात दाखल आहे.

त्यामध्ये सत्र न्यायालयाने बोठे याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. मात्र, आता घटनेला महिना होत आला तरीही बोठे फरारी आहे. अशातच आता या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागले आहे.

रेखा जरे खून प्रकरण नेमके काय ?

रेखा जरे या पुण्यावरून अहमदनगरला येत असताना जातेगावच्या घाटात असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रेखा यांना काही वेळातच नगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

घटनेत घातपाताचा देखील संशय सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता तसेच घडलेले कारण हे तात्कालिक नसावे तर हा पुर्ननियोजीत कट असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत होती आणि अखेर ती खरी ठरली.

गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून रेखा जरे यांची आरोपीसोबत बाचाबाची झाली आणि त्यानंतरच जरे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला.

जरे यांच्यासोबत त्याच्या आई आणि लहान मुलगा होता. गाडीचा मिरर लागल्याच्या शुल्लक कारणावरून हुज्जत घालण्यास सुरुवात झाली होती.

रेखा जरे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे जरे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी बोठे देखील हजर होता तेव्हापासूनच पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता.

दरम्यान याच गुन्ह्यातील इतर आरोपीना अटक होताच बोठे फरार झाला आणि अद्यापदेखील पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

दरम्यान या घटनेमुळे नगर जिल्हा हादरून गेला असून लवकरात लवकर बोठे यास अटक करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here