Crime News | जालन्यात बनावट लग्न करणाऱ्या महिलांची टोळी जेरबंद

143

जालना : समाजात मुलींची संख्या घटत चालल्याने उपवर मुलांच्या लग्नाची समस्या अतिशय गंभीर झाली आहे, याच समस्येचा व्यापार झाला आहे. काही जणांच्या टोळ्या बनावट लग्न लावण्यात कार्यरत आहेत.

गुजरात राज्यातील जुनागड येथील रहिवासी पियुष वसंत यांनी 8 जानेवारी रोजी जालन्यातील चांदनजीरा पोलीस ठाण्यात एक तक्रार केली. 

या तक्रारीमध्ये त्यांनी लग्न करुन आणलेल्या तीन मुलींनी गाडीतील रक्कम आणि मोबाईल असा 30 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची आणि फसवणूक केल्याची तक्रार केली.

त्यांच्या या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली ज्यात त्यांना पुढील धक्कादायक माहिती मिळाली.

फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या नात्यातील काही जण तीन तरुणांच्या लग्नासाठी मुली शोधत होते. मात्र गुजरात मध्ये मुलगी मिळत नसल्याने त्यांनी महाराष्ट्रातील एका पुरुष एजंटला संपर्क केला.

त्याने जालन्यातील एजंटच्या माध्यमातून मुलींचा शोध सुरु केला. यावेळी जालन्यातील एजंटने आमच्याकडे तीन अनाथ मुली असून त्या गरीब आहेत. त्यांच्या लग्नासाठी मुलं शोधत असल्याचे सांगितले.

दरम्यान या मुलींना पहिल्यानंतर त्यांना पसंत करुन बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा इथे विधीनुसार तिन्ही तरुणांची या तरुणींसोबत लग्न लावण्यात आली. यासाठी एका वकिलामार्फत बॉण्ड देखील तयार करण्यात आला.

दरम्यान लग्नानंतर तिन्ही जोडपी गाडीने गुजरातला रवाना झाली. यावेळी नागेवाडी नाक्यावर मुलींनी लघुशंकेचं कारण सांगत गाडी थांबायला लावली.

बराच वेळ होऊनही मुली न आल्याने त्यांच्या मोबाईलवर फोन केला असता, त्यांनी फोनवर धमकी देण्यास सुरुवात केली.

दरम्यान या मुलींनी गाडीतील रोख रक्कम आणि मोबाईल फोन लंपास केल्याचे लक्षात आल्यावर या मुलांनी थेट पोलीस स्टेशन गाठले.

या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. यासाठी एका स्वतंत्र पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

दरम्यान पोलिसांना एका खबऱ्यामार्फत जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथील एका महिलेची माहिती मिळाली. शिवाय जालना शहरात याच टोळीतील एक आरोपी महिला येत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या दोन महिलांना ताब्यात घेतलं आणि या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना भाऊ म्हणून मदत करणाऱ्या आरोपीलाही अटक केली आहे.

इतर दोन मुलींना औरंगाबाद आणि बुलढाणा जिल्ह्यातून पोलिसांनी अटक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी एकूण चार महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे.

त्यांच्याकडून मोबाईल फोन, रोख रक्कम आणि एक क्रूझर असा 4 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने आणखी किती जणांना फसवलं याचा शोध पोलीस घेत आहेत.

दरम्यान न्यायालयाने त्यांना 19 जानेवारी रोजी दोन दिवसाची पोलीस कोठडी सूनवली आहे, ज्यात पोलिसांना या महिलांच्या टोळीने आणखी किती जणांना गंडवले हे स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here