मुंबई : खार येथे जान्हवी कुकरेजा (19, रा. सांताक्रुझ) या तरुणीच्या हत्येप्रकरणी अखेर दोघांना खार पोलिसांनी अटक केली.
त्यात जान्हवीचा प्रियकर श्री जोगधनकर आणि बालपणीची मैत्रिणी दिया पडणकर यांचा समावेश आहे.
त्यांना वांद्रे न्यायालयाने 7 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
खारच्या भगवती हाईट्स इमारतीमध्ये थर्स्टी फर्स्टच्या मध्यरात्री एका पार्टीचे आयोजन करण्यात आले.
या पार्टीत जान्हवीसह दिया आणि श्री हे तिघेही आले होते. या पार्टीनंतर सगळे निघून गेले.
जान्हवी रक्तबंबाळ अवस्थेत अपार्टमेंटच्या दुसर्या मजल्यावरील जिन्यावर पडल्याची दिसून आली.
पार्टीत सहभागी झालेल्या प्रत्येकाची पोलिसांकडून चौकशी करून जबानी नोंदवण्यात आली.
त्यात जान्हवीचे दिया आणि श्रीसोबत वाद झाल्याचे उघडकीस आले.
यासंदर्भात एका वरिष्ठ अधिकार्याने बोलताना सांगितले.
जान्हवी सांताक्रुझ परिसरात राहत असून सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती.
दिया ही तिची बालपणीची मैत्रिण, तर श्रीसोबत तिचे प्रेमसंबंध असल्याचे बोलले जात होते.
मात्र श्री नेहमीच काही तरुणींसोबत जवळीक साधून त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करायचा.
थर्स्टी फर्स्टच्या रात्री तिने दिया आणि श्री या दोघांना लगट करताना पाहिले.
यावेळी त्यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. या वादातून हल्ला झाला असावा.
त्यातून या दोघांनी तिला बेदम मारहाण केली होती, असे पोलिसांनी सांगितले.
अमानुष मारहाण
शुक्रवारी पहाटे ‘भगवती हाइट्स’ इमारतीच्या तळमजल्यावरील जिन्याजवळ जान्हवीचा मृतदेह पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात आढळला.
प्राथमिक पाहणी आणि कूपर रुग्णालयात पार पडलेल्या शवचिकित्सेतून जान्हवीच्या कवटीचा अस्थिभंग (ला फ्रॅक्चर) झाल्याचे निदर्शनास आले.
कपाळावर आणि डोक्याच्या मागील बाजूस खोलवर जखमा आढळल्या.
तसेच डोके , चेहरा, हात, गुडघे, निगडी, खुबा येथेही जखमा आणि खरचटल्याचे व्रण आढळले.
-इमातरीच्या दुसऱ्या मजल्यावरील जिन्याच्या लोखंडी गजांवर, भिंतींवर रक्ताचे डागही पोलिसांना आढळले.
तसेच दुसऱ्या मजल्यापासून तळमजल्यापर्यंत केसही सापडले.
न्यायवैद्यक पथकाने हे सर्व नमुने चाचणीसाठी ताब्यात घेतले आहेत.
दुसरीकडे दिया आणि श्री हेही जखमी आहेत. श्री याच्या डोक्यावर जखम असून हात, दंड, पाठीवर ओरबाडल्याचे व्रण आहेत.
जखमा आणि घटनास्थळावर आढळलेल्या खाणाखुणांवरून श्री, दिया आणि जान्हवी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले असावे.
श्री आणि दिया यांनी केस पकडत भिंतीवर, जिन्याच्या लोखंडी गजांवर जान्हवीला आपटले, हाताने मारहाण केली, जिन्यावरून फरफटत खाली आणले असावे.
जान्हवीनेही दोघांचा बराच वेळ प्रतिकार केला असावा. त्यात दोघेही जखमी झाले असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला.
लैंगिक अत्याचार?
प्राथमिक पाहाणीत जान्हवीच्या मृतदेहावरील कपडे अस्ताव्यस्त होते.
ही स्थीती श्री, दिया यांच्यासोबत घडलेल्या झटापटीमुळे घडली की जान्हवीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला गेला.
याबाबत पोलीस तपास करत आहेत. तपासाशी संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्याने या माहितीस दुजोरा दिला.
आमंत्रण नव्हते
भगवती हाईट्स इमारतीत आयोजित कार्यक्रमाचे आमंत्रण आरोपी श्री याला नव्हते.
जान्हवी, दिया यांच्यासोबत तो या कार्यक्रमात सहभागी झाला.
तसेच जान्हवीचा प्रियकर म्हणून त्याची ओळख कार्यक्रमात सहभागी झालेल्यांशी करून देण्यात आली.