नाशिक सिडको : मोबाईलवरून केलेले कॉल, त्यांचे डिटेल्स, कॉलचे लोकेशन हे पोलिसांसाठी फार मोठं शस्त्र ठरत आहेत. अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा तपास करणं यामुळे पोलिसांना शक्य झाले आहे.
नाशिकमधील अशाच एका खुनाचा छडा पोलिसांनी कॉल डिटेल्सच्या मदतीने लावला आहे. या प्रकरणात गुन्हेगारांनी कोणताच पुरावा मागे सोडला नव्हता. पण पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला.
नाशिकमधील अंबड पोलिस ठाणेच्या हद्दीतील अंबड गाव येथील माहेरी आलेल्या विवाहितेचा चांदवड येथे नेऊन घाटात खून केला होता.
या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलिसांनी चार दिवसांत सुमारे साडे सात लाख कॉल डिटेल्सच्या मदतीने लावला आणि आरोपीला शोधून काढले.
चांदवड येथील राहुड गावच्या शिवारात एका शेताजवळ पोलिसांना एक महिलेचा मृतदेह मिळाला होता. सर्वसाधारण ३५ ते ४० वयोगटातील ही महिला होती.
पोस्टमार्टेम केल्यानंतर या महिलेचा गळा दाबून खून केल्याचं निष्पन्न झालं. पण गुन्हेगारांनी कोणताच पुरावा मागे सोडला नसल्याने, या गुन्ह्याचा तपास करणं हे पोलिसांसाठी आव्हाना बनलं होतं.
सर्वांत मोठं आव्हान होतं ते म्हणजे या महिलेची ओळख पटवणं. या प्रकरणी चांदवड पोलिस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या नंतर सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. त्याचवेळी नाशिकचे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक के. के. पाटील यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला.
यावेळी प्रथम बेपत्ता महिलेची कोणत्या पोलिस ठाण्यात नोंद आहे याची माहिती घेणे सुरू केले. दरम्यान नीता नारायण चित्ते या नावाची एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार अंबड पोलिस ठाण्यात नोंद असल्याची माहिती पुढं आली.
निता नारायण चित्ते ही महिला अंबड येथे माहेरी आली होती आणि दि. १४ जुन २०२० रोजी घरातून बेपत्ता असल्याची तक्रार दि. १ ५ जून रोजी अंबड पोलिस ठाणे येथे नोंद झाली होती.
अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस कुमार चौधरी व गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कमलाकर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता.
नीताचा खून झालेल्या ठिकाणी असलेली साडी व बेपत्ता नोंद करताना दिलेल्या फोटोतील साडीचा रंग एकच होता. त्यामुळे खून झालेली महिला नीता चित्ते असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी नीताचे नातेवाईक आणि पती नारायण यांना बोलवून घेतले असता हा मृतहेद नीताचा असल्याचं निष्पन्न झाले. तपासाच्या दृष्टीने पहिला टप्पा पोलिसांनी पूर्ण केला होता. पण खून करणारे नेमके कोण याचा काही मागमूस लागत नव्हता.
पोलिसांनी त्यानंतर मृतदेह ज्या ठिकाणी सापडला तेथील मोबाईलचे कॉल रेकॉर्डस तपासण्यास सुरूवात केली. हे काम मुळातच किचकट असते.
काही हजारांत कॉल रेकॉर्डसची पडताळणी केल्यानंतर पोलिसांना विनय निंबाजी वाघ (रा. नाशिक) आणि भरत निंबाजी मोरे (रा. उल्हासनगर) या दोघांचे कॉल संशयास्पद असल्याचं लक्षात आलं.
पोलिसांनी या दोघांना उचलून आणले आणि पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली. दोघांनी गुन्हा कबूल केला आणि निताचा पती नारायण याने पत्नीला संपवण्यासाठी १० लाखांची सुपारी दिल्याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी सखोल चौकशी केली असता नारायण याचा निताच्या चारित्र्यावर संशय होता. त्यातून त्यांना त्याचा जवळचा मित्र विनय यालाच ही खुनाची सुपारी दिली असल्याचं निष्पन्न झालं.
हा खून पूर्वनियोजितरित्या करण्यात आला होता. कोणताही पुरावा मागे राहाणार नाही, याची काळजी संशयितांनी घेतली होती. संशयितांपैकी एक जण वाहिद अली याने सोशल मीडियावरून नीताशी मैत्री केली होती.
मैत्रीच्या बहाण्याने भेटायला बोलावून एक कारमध्ये नीताचा गळा आवळून खून करण्यात आला. नीता सोशल मीडिया आणि व्हॉटसॲपवर चांगलीच सक्रिय होती आणि सोशल मीडियामुळे तिचे काहींशी मैत्री झाली होती.
त्यामुळे आपल्यावर पोलिसांचा संशय येणार नाही असा संशयितांचा विश्वास होता. पण शेवटी पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने हा तपास लावला.
यात चांदवडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, नाशिकचे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक के. के. पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल वाघ आदींनी सुमारे साडे सात लाख कॉल तपासले व आरोपी पर्यत पोहोचून त्यांना अटक केली.
या कामगिरीसाठी पोलिस कर्मचारी हेमंत गिलबिले, मंगेश गोसावी, सुशांक मरतड, घुगे, बहिरम यांचे सहकार्य लाभले होते.
असे तपासले जातात कॉल रेकॉर्ड
आपण जेव्हा कॉल करतो तेव्हा तो जवळच्या मोबाईल टॉवरवर जातो. तेथून तो संबंधित मोबाईलवर पाठवला जातो. पोलिस असा टॉवरवरील कॉल रेकॉर्ड तपासू शकतात.
यातील जे कॉल संशयित वाटतात, त्यांची अधिक चौकशी केली जाते. यासाठी काही अत्याधुनिक सॉफ्टवेअरही पोलिस विभाग वापरत असते.