Crime News | नवरा-भावजयीच्या अनैतिक संबंधाला विरोध करणे पत्नीच्या जीवावर बेतले

228
Murder Crime News

भोकरदन (जिल्हा जालना) : आपल्या समाजात भावाची बायको आई समान मानली जाते.

मात्र या पवित्र नात्याला काळिमा फासणारे कामांध आपल्या समाजात आढळतात.

त्यातुन जेव्हा मोठा गुन्हा घडतो, तेव्हा समाजात नात्याच्या व व्यक्तिच्या दुर्गुणांचे दर्शन होते.

अशीचं संतापजनक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे, लहान भावजयीसोबतच्या अनैतिक संबंधात पत्नी अडथळा ठरत होती.

हा अडथळा दूर करण्यासाठी पत्नीचा निर्दयीपणे खून केल्यानंतर घाबरलेल्या पतीने विषारी औषध प्राशन केले.

ही घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कुंभारी या गावी (ता.16) शनिवारी सांयकाळी उघडकीस आली.

दरम्यान संशयित आरोपी पतीची परिस्थिती गंभीर आहे.

त्याच्यावर जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आशा रतन साळवे (वय 38) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

याविषयी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व मयत महिलेच्या भाऊ राजू कडूबा पगारे (रा.नळणी बुद्रुक ता.भोकरदन) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

फिर्यादीनुसार आशा हिचा विवाह 20 वर्षांपूर्वी भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथील रतन सांडू साळवे याच्या सोबत झाला होता.

त्यांना एक मुलगा मंगेश साळवे व मुलगी वर्षा साळवे असे दोन अपत्ये आहे.

मात्र, रतन साळवे याचे त्याच्या लहान भावजयी सोबत अनैतिक संबंध होते.

त्यामुळे तो पत्नी व मुलांना नेहमी त्रास देऊन या कारणाने मारहाण करीत होता.

अनेकदा त्याच्या त्रासाला कंटाळून आशा साळवे ही आपल्या माहेरी नळणी बुद्रुक येथे राहत होती.

पतीचा जाच व त्याचे बेछूट वागण्याला कंटाळून दोन दोन महिने माहेरी राहत असल्याचे तिच्या भावाने तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान गावात कामधंदा नसल्याने मागील काही वर्षांपासून हे सर्वजण वडगाव कोल्हाटी ता. औरंगाबाद येथे कामानिमित्त राहत होते.

शुक्रवारी (दि.१५) कुंभारी ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने हे दोघे पती, पत्नी (दि.१४) मतदानासाठी कुंभारी येथे आले होते.

शनिवारी सायंकाळी रतन साळवे यांच्या घराला कुलूप होते.  मात्र, खिडकी उघडी असल्याने घराशेजारी खेळत असलेल्या एका लहान मुलीने खिडकीतून आत बघितले.

तेव्हा आशा साळवे ही पलंगावर झोपलेली व तोंडातून रक्त येत असलेल्या अवस्थेत आढळून आली.

या मुलीने याबाबत शेजाऱ्यांना सांगितले. शेजाऱ्यांनी खिडकीतून बघितले व तात्काळ याबाबत भोकरदन पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे, पोलिस निरीक्षक चत्रभुज काकडे, पोलिस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे, पोलिस कर्मचारी रामेश्वर सिनकर, शेख आसेफ यांनी धाव घेऊन पंचनामा केला.

संशयित पती पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता या ठिकाणी शेगडीचे तार प्रेताजवळ ठेवून हा खून नसून शॉक लागल्याचा बनाव करण्यात संशयित आरोपींकडून करण्यात आल्याचे पोलिसांना दिसून आले.

परंतू शेजारच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर व घटनास्थळाच्या पाहणीवरून पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवून संशयित पतीला भोकरदन येथून बहिणीच्या घरून ताब्यात घेतल्याचे पोलीसांनी सांगितले.

खून करून घेतले विषारी औषध

दरम्यान संशयित पतीने पत्नीचा काटा काढण्यासाठी डोक्यावर जबर मारहाण केली.

यानंतर स्वतःही विषारी औषध प्राशन केले.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर भोकरदन ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रेताजवळच पोलिसांना विषारी औषधाची बाटली आढळून आली आहे, पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here