विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी अनैतिक संबंध ठेवले.
त्यानंतर तिच्याकडून पैशांची मागणी करत तिचा शारीरिक व आर्थिक छळ केला.
या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना 29 डिसेंबर रोजी डांगे चौक, वाकड येथे घडली.
याबाबत मृत महिलेच्या पतीने पोलिसात फिर्याद दिली आहे.
आकाश प्रभू सूर्यवंशी (रा. काळेवाडी. मूळ रा. वागदरी, ता. उदगीर. जि. लातूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत येशू मल्हारी सूर्यवंशी (वय 37, रा. खराडी, पुणे. मूळ रा. वागदरी, ता. उदगीर, जि. लातूर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूर्यवंशी हे गवंडी काम करतात.
आरोपी आकाश याने फिर्यादी सूर्यवंशी यांच्या पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत अनैतिक संबंध ठेवले.
फिर्यादी यांना मारण्याची धमकी देऊन त्यांच्या पत्नीला आणि मुलांना त्यांच्यापासून दूर केले.
त्यानंतर पत्नीला ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसे उकळले.
आकाश याने फिर्यादी यांच्या पत्नीला शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले.
या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या पत्नीने गळफास घेऊन डांगे चौक, वाकड येथील घरी आत्महत्या केली. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.