जळगाव : पारोळा तालुक्यामधील एका गावातील १६ वर्षीय मुलीवर गावातीलच एका नराधमाने बलात्कार केला असून पीडित मुलगी ६ महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यामधील एका गावात १६ वर्षीय मुलगी आपल्या आई भावासह राहते.
आई शेतीकाम करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करते. साधारण सहा महिन्यापुर्वी पीडित मुलीची आई व भाऊ हे लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते.
त्यादिवशी गावातील संशयित आरोपी रवींद्र शामराव पाटील हा दारू पिऊन अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना रात्री ११ वाजता घरात आला. झोपेतच संशयित आरोपी रवींद्र पाटील याने तिच्यावर बलात्कार केला.
याबाबत कोणाला वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही पीडितेला देण्यात आली. दरम्यान, पीडितेच्या आईला संशय आल्याने धुळे येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात तपासणी केली असता पीडिता सहा महिन्याची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या नराधमाने पुन्हा दारू पिऊन दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास येवून पीडित मुलीस मारहाण व शिवीगाळ करून पुन्हा अत्याचार केला. आईने मुलीस विश्वासात घेवून विचारपूस केली असता हा प्रकार उघड झाला.
संशयित आरोपी रवींद्र पाटील यानेच अत्याचार केल्याचे मुलीने आईला सांगितले. पीडितेच्या फिर्यादीवरू पारोळा पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वेय गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रवींद्र बागुल करीत आहे.