सुरत : मित्र-मैत्रीणींचे नाते अधिक विश्वासाचे असते. जगात सर्वात जास्त मित्रावर विश्वास ठेवला जातो. जेव्हा मैत्रीचा गैरफायदा घेतला जातो तेव्हा या विश्वासाच्या नात्याला तडा जातो.
अशीच एक मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातल्या आरोपीनं जुन्या मैत्रिणीच्या विश्वासाचा फायदा घेत तिला एका हॉटेलमध्ये नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर त्याने ब्लॅकमेल करत तिच्यावर अनेकदा अत्याचार केले. हा सर्व प्रकार 2019 पासून सुरु होता. या प्रकरणात अखेर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण?
गुजरातमधील सुरत शहरातील हा सर्व प्रकार आहे. दक्षेश मिस्त्री असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. पीडित महिलेला लग्नापूर्वीपासून दक्षेस ओळखत होता. या महिलेचं 2014 साली लग्न झाले.
तिला आता दोन मुली देखील आहेत. 2019 साली एका रेस्टॉरंटमध्ये अचानक त्यांची पुन्हा एकदा भेट झाली. त्यांनी परस्परांशी फोन नंबर शेअर केले. पीडित महिलेनं RTO ऑफिसमधील काही कागदपत्रांबाबत आरोपीशी संपर्क साधला.
त्यावेळी आरोपीनं तिला एका हॉटेलमध्ये नेलं. हॉटेलमधील पेयात आरोपीनं गुंगीचं औषध मिसळून आपल्याला बेशुद्ध केले आणि अत्याचार केले असल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे.
या बलात्काराचे फोटो आणि व्हिडीओ चित्रण करुन आरोपी महिलेला धमकावत असे. महिलेच्या असाह्यतेचा फायदा घेत आरोपीनं तिच्यावर अनेकदा बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल होताच, आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याच्या शोधासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे.