यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणात माध्यमे आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणाऱ्यांनी जबाबदारीने वागावे.
मीडिया ट्रायल घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कोर्टाला हस्तक्षेप करून आदेश द्यावा लागेल, अशी तंबी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी दिली आहे.
मीडिया ट्रायलच्या मार्गातून तपासावर परिणाम होऊ नये म्हणून कोर्टाने हे निर्देश दिले असले तरी घटना घडून १३ दिवस होऊन देखील अद्यापही घटनेमागचे कारण शोधण्यास यश आलेले नाही.
सोबतच अटक केलेल्या आरोपींकडून देखील सुपारी घेतल्यापलीकडे काही हाती लागलेले नाही. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, बाळ बोठे याने काही दिवसापूर्वी नगर इथे हनी ट्रॅपचे रॅकेट कसे कार्यरत आहे.
याबद्दल एक मालिका छापली होती. त्या मालिकेत कसे धनदांडगे सावज हेरून जाळ्यात ओढले जाते आणि नंतर माहितीतील पोलिसांची मदत घेत धाड घालून कशा पद्धतीने ‘ मांडवली ‘ केली जाते याचा लेखाजोखा देखील दिला होता.
अर्थात ही माहिती बोठे यांच्यापर्यंत कशी पोहचत होती हे मात्र गूढ आहे.
नगर शहरात असलेल्या या हनी ट्रॅपमध्ये कोण कोण सहभागी आहेत याचाच पोलीस सध्या शोध घेत आहेत तसेच रेखा जरे यांच्या खुनाशी देखील हनी ट्रॅप निगडित आहे का ? अशा अँगलचा देखील शोध सुरु आहे.
नाजूक विषय असल्याने कोणी पुढे येऊन पोलिसांना मदत करण्यास धजावत नाही तसेच ‘ झाकली मूठ सव्वा लाखाची ‘ अशा रीतीने मोठी धेंडे देखील बदनामीपोटी गप्प आहेत.
टीव्ही ९ मराठीचे वृत्त नक्की काय ?
“हनी ट्रॅप : बुलाती है, मगर जाने का नही…नगरच्या ‘ज्योती’चा पुण्या-मुंबईत जलवा….” या हेडलाईनखाली बाळ बोठेने एक लेख छापला होता.
यामध्ये नगरमधील एक महिला, जिला त्याने ज्योती असं नाव दिलं, ती कशाप्रकारे आपले सावज हेरते आणि त्यांना लुटते याची कहाणी त्याने लिहली होती.
काय होता लेख ?
विविध क्षेत्रांतील ‘वजनदार’ आणि धनिकांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या ‘हनी ट्रॅप’ची नगरमध्ये लावलेली ‘ज्योत’ चांगलीच ‘तेवत’ आहे.
मात्र, तिच्या विखारी तेजामुळे अनेकांचे कौटुंबिक वातावरण काळवंडत आहे. नगर जिल्हा पादाक्रांत केल्यानंतर या ‘ज्योती’ने आपले ‘अनोखे रुप’ दाखवत औरंगाबाद, नाशिक, सोलापूरसह आसपासच्या जिल्ह्यांतील ‘बाजारपेठ’ही काबीज केली. आता तर ‘ज्योती’चा जलवा थेट पुण्या-मुंबईपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे मंत्रालयाच्या केवळ दारात न स्थिरावता तेथील काही मजले ‘ज्योती’ने आपल्या कवेत घेतले आहेत.
भिंगारदिवेंच काम काय?
टोळीच्या या म्होरक्यांपैकी एकाने ‘भिंगार’चे ‘दिवे’ पाजळत ‘सागर’तळ ढवळला. या म्होरक्याचेही अनेक उद्योग आहेत. हनी ट्रॅपसाठी ‘बकरा’ शोधणे, त्यांच्या ‘कार्यक्रमा’ची वेळ आणि ठिकाण ठरवणे करीत होता.
बकरा पटवण्यासाठी संबंधित महिलांना अश्लील व्हिडिओ उपलब्ध करुन देणे, संभाषणाच्या ‘ट्रिक’ सांगणे आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ‘सागर’तळ ढवळत पार पाडल्या जातात.
या हत्याकांडाचा शोध लावताना पोलिसांनी बाळ बोठेने लिहिलेले लेखही वाचणं गरजेचं आहे, कारण यात अनेक पुरावे असण्याची शक्यता दाट आहे.
नगरमधील ‘देव’माणूस
नगरमध्ये हनी ट्रॅप… पोलिस अधिकारी, व्यापारी, धनिकही प्रेम”जाळ्या”त… अशा हेडलाईनखाली त्याने हा लेख छापला. या लेखात त्यानं नाव न घेता एका प्रतिष्ठित व्यक्तीचा उल्लेख केला.
नगरमधील एक ‘देव’माणूस ‘ब्लॅकमेलिंग’ करणाऱ्या टोळीच्या कचाट्यात ‘दत्त’ म्हणून सापडला. टोळीच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘मामी’च्या मोहजालात शिरकाव केल्यानंतर या ‘देवा’ला नगर शहराजवळील एका हॉटेलमध्ये नेण्यात आले.
तेथे ‘योग्य’ वेळ येताच ‘मामी’च्या सांकेतिक इशाऱ्यानुसार ‘टीम ब्लॅकमेलर’ हजर झाली. ‘देव’माणसाची प्रारंभी धुलाई करुन त्याच्यावर दहशत निर्माण करण्यात आली.
‘त्या’ घटनेचे लाइव्ह रेकॉर्डिंग करण्यात आले. त्यानंतर ‘देव’माणसाचा कबुलीजबाब वजा व्हिडीओ तयार करण्यात आला. त्याच्या गळ्यातील सुमारे तीन लाखांची सोनसाखळी आणि रोख रक्कम तर घेतलीच; शिवाय ‘ऑन द स्पॉट’ त्याच्याकडून पाच लाखांची अतिरिक्त वसुलीही करण्यात आली.
या लेखातून बाळ बोठेने हनी ट्रॅपचा धंदा कसा फोफावत आहे, आणि त्याला समाजातील बडे अधिकारी, राजकारणी कसे बळी पडलेत याची पोलखोल केली.
या पोलखोलीनंतर या टोळ्यांकडून पत्रकारांना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचंही तो यात म्हणतोय. या सगळ्या प्रकरणात अनेक पैलू असल्याने पोलिसांना तपास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मुंबईतील ‘डॅडी’-‘मम्मी’चीही मदत
लेखांची मालिका सुरु केल्यानंतर विविध क्षेत्रांतील महिलांना किंवा भाडोत्री महिलांना पुढे करुन विनयभंग, बलात्काराचे गुन्हे नोंदवण्याची व्यर्थ धडपड टोळीने चालवल्याचे समजते.
हे नाही जमले तरी किमान म्होरक्या अथवा त्याच्या समर्थकांमार्फत “अट्रॉसिटी’चा गुन्हा अथवा अपघात घडवून आणण्याचा पर्याय निवडायचा, असेही दिसत आहे.
जर गरज पडल्यास मुंबईतील ‘डॅडी’ अथवा ‘मम्मी’चीही मदत घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बाळ बोठेला ही माहिती कुठून मिळत होती, त्याचा खबऱ्या कोण होता? हनी ट्रॅपच्या प्रकरणाची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहेत.
त्यात कुणाकुणाचा हात आहे? बाळ बोठेने यात फायदा करुन घेतला की कोळश्याच्या धंद्यात त्याचेही हात काळे झाले. हे तपासणं आता जास्त गरजेचं आहे.
त्यासाठी बाळ बोठेने सुरु केलेली ही मालिका बारकाईने वाचणं, आणि त्यातील संबंधित व्यक्तींपर्यंत पोहचून तपास करणं जास्त गरजेचं आहे.
कदाचित यातून आणखी मोठं सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. पण सध्या तपासाचा रोख दुसऱ्याच दिशेनं असलेला पाहायला मिळत आहे.
दरम्यान पोलिसांनी फरार आरोपी बाळ बोठेच्या घरी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांना काही ठोस पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे अंतरिम जामिनाच्या आशेवर फरार असलेल्या बाळा बोठेच्या अडचणी वाढल्या आहेत.
तेव्हा आरोपी बाळा बोठेला अटक करण्यात येईल, असा विश्वासही पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले, “रेखा जरे हत्याप्रकरणी आरोपी बाळ बोठेच्या घरावर आणि घरातील कार्यालयावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत आरोपी बाळ बोठेच्या घरातून काही ठोस पुरावे मिळाले आहेत. त्यांचा या गुन्ह्याच्या तपासात समावेश करण्यात आला आहे.”
“आरोपीचा शोध घेण्यासाठीही पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक होईल, असा आम्हाला विश्वास आहे.
मी नागरिकांनाही आवाहन करतो की आरोपीविषयी कुणाला कोणतीही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याविषयी पूर्ण गोपनीयता पाळली जाईल,” असंही मनोज पाटील यांनी नमूद केलं.
काय आहे प्रकरण ?
रेखा जरे या पुण्यावरून अहमदनगरला येत असताना जातेगावच्या घाटात असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रेखा यांना काही वेळातच नगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. घटनेत घातपाताचा देखील संशय सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता तसेच घडलेले कारण हे तात्कालिक नसावे तर हा पुर्ननियोजीत कट असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत होती.
गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून रेखा जरे यांची आरोपीसोबत बाचाबाची झाली आणि त्यानंतरच जरे यांच्यावर हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे.
या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला. जरे यांच्यासोबत त्याच्या आई आणि लहान मुलगा होता. गाडीचा मिरर लागल्याच्या शुल्लक कारणावरून हुज्जत घालण्यास सुरुवात झाली असल्याचे बोलले जात आहे .
जरे यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
दरम्यान या घटनेमुळे नगर जिल्हा हादरून गेला असून अवघ्या काही तासांत आरोपीस गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र कथित मुख्य सूत्रधार असलेला पत्रकार बाळ बोठे हा अद्याप फरार आहे.