अकोला : आई या शब्दावर ईश्वर देखील विश्वास ठेवतो. आईच्या पोटात जगातील सर्व गुन्हे माफ केले जातात, पण तीच आई जेव्हा सावत्र आई होते तेव्हा क्रूरतेचा चेहेरा बनून समोर येते.
अशीच एक धक्कादायक व संतापजनक घटना समोर आली आहे, आईनेच आपल्या मुलाला गरम तव्यावर उभे करून सतत तीन दिवस शारिरीक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार येथील ९ वर्षीय आर्यनला आपल्या सावत्र आईच्या जाचातून शेजारच्यांनी सोडवत रुग्णालयात दाखल केले.
परंतु सावत्र आईने त्या मुलाचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आईने मुलाचे हातपाय पकडून त्याला गरम तव्यावर उभे करून चटके दिले. त्याने आवाज करू नये म्हणून त्याचे तोंड दाबून ठेवण्यात आले.
त्याचा सतत तीन दिवस छळ केला. तिस-या दिवशी जेव्हा मुलाने आरडा ओरडा केला. तेव्हा शेजारच्यांचा हा प्रकार लक्षात आला. शेजारच्यांनी आर्यनची सुटका करून त्याला ताबडतोब खामगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
विशेष म्हणजे हा सर्व प्रकार आर्यनचे वडील डोळ्याने पाहत असूनही त्यांनी मुलाला आईच्या तावडीतून सोडवले नाही अशी माहिती गावातील नागरिकांनी पोलिसांना दिली.
परंतु त्या मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अकोला येथे हलविण्यात आले. प्रकरणाचा पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहेत.