टिंडर डेटिंग App वर ओळख झाल्यांनतर त्याचा गैरफायदा घेत महिलांवर बलात्कार करण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.
टिंडर डेटिंग App वरून ओळख झालेल्या मित्राने एअर होस्टेस असलेल्या तरुणीवर बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.
त्यानंतर आता एका तरुणाने विधवा असलेल्या महिलेसोबत टिंडर डेटिंग App द्वारे मैत्री करून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अमन दीपक सिंग (वय 29, रा. डांगे चौक, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार 12 जून 2020 पासून 24 सप्टेंबर 2020 या कालावधीत जे डी पॅराडाईस ताथवडे, स्टे-इन हॉटेल पुनावळे, कम्फर्ट एक्झिक्युटिव्ह हॉटेल मारुंजी, द आदिती इन हॉटेल विनोदे वस्ती हिंजवडी या ठिकाणी घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमन आणि पीडित महिलेची ओळख टिंडर या डेटिंग अॅपवरून झाली. त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले.
त्यानंतर अमन याने महिलेला लग्नाचे अमिश दाखवले. महिला विधवा असल्याचे माहिती असताना अमन याने तिला ताथवडे, पुनावळे, मारुंजी, हिंजवडी येथील विविध हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
महिलेने त्याला लग्नाबाबत विचारले असता त्याने महिलेच्या तोंडावर बूट फेकून मारला आणि लग्नाला नकार दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
नुकताच उघडकीस आलेला असाच प्रकार
टिंडरवरून ओळख झालेल्या मित्राने एअर होस्टेस असलेल्या तरुणीला हिंजवडी येथील एका हॉटेलवर नेऊन जबरदस्तीने दारू पाजली.
त्यानंतर तिला त्याच्या घरी नेऊन मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. ही घटना 26 डिसेंबर रोजी घडली. पोलिसांनी आरोपी मित्राला अटक केली आहे.
अभिजित सीताराम वाघ (रा. तापकीर नगर चौक, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित एअर होस्टेस तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.