मुंबई : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी.
याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
या विधेयकानुसार शिक्षेचे प्रमाण वाढविले असून नवीन गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आले आहेत.
या कायद्यांचा मोठा गाजावाजा राज्य सरकारतर्फे करण्यात आला होता.
मात्र, हे कायदे किती अंमलात येऊन पीडितांना न्याय मिळवून देणार यावर अनेक प्रश्न विरोधकांनी उभे केले.
आता चक्क महाविकास आघाडीच्या राज्य सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.
राज्याचं उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद असे महत्वाचे पद असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्याविरोधात विनयभंगाचा व बळजबरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद शहरातील बायजीपुरा येथे राहणाऱ्या खाजगी शिकवणी घेणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याच संदर्भात भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
महिलासुरक्षेच्या बाता मारणार्या राज्यसरकार मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकअध्यक्षवर अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल.चौकशी व तपासाच्या नावाखाली अद्याप पोलिसांनी अटक देखील केलेली नाही.
आगामी शक्ती विधेयकात सत्ताधारी पक्षकार्यकर्त्यांसाठी काही वेगळे नियम बनवलेत का? याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी द्यावं.
यासोबतच, पीडितेच्या कुटुंबावर दबाव आणला जात आहे. कायद्यानुसार पीडिता वा कुटुंबावर दबाव येऊ नये म्हणून आरोपीला अटक करण्याचा नियम आहे, मात्र तो इथे डावलण्यात आल्याचा आरोप देखील चित्र वाघ यांनी केला आहे.