मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याने उदगीरात दगडफेक | शहरात तणाव

384

उदगीर | आठ दिवसांपूर्वी मारहाण झालेल्या एका युवकाचा येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

त्यानंतर नातेवाइकांनी प्रेत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर ठेवले.

पोलिसांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली, त्याच दरम्यान शहर पोलीस ठाण्यासमोर जमावाने दगडफेक केली.

या घटनेचे वृत्त शहरात कळतात अवघ्या अर्ध्या तासात शहर सामसूम झाले.

अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून घरी जाणे पसंत केले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की तोंडार ता.उदगीर येथील ऑटो पॉईंटवर चौकात बुधवार (दि. १३) रात्री आठच्या सुमारास पैशाच्या देण्याघेण्याच्या वादातून मारहाण झाली होती.

संशयित आरोपी तानाजी फुले, राजकुमार बिरादार दोघेही रा. हैबतपुर, महेश बिरादार, शांतवीर बिरादार-दोघेही रा. मलकापूर यांनी संगनमत करून लोखंडी गज, काट्या व हॉकी स्टिकने मारहाण केली.

फिर्यादीचा चुलत भाऊ बशीर अहमद सय्यद (वय-३०) रा. हैबतपुर यास घेतलेले पैसे परत कर म्हणत शिवीगाळ केली.

याच आरोपीनी मयताच्या डोक्यात अंगावर मांडीवर मारहाण करून गंभीर जखमी केले आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

या आशयाची फिर्याद चुलत भाऊ फिरोज निजामसाब सय्यद- रा.हैबतपुर याने रविवारी दिल्यावरून ग्रामीण पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मंगळवार (दि.१९) सकाळी उपचार घेत असताना या मारहाण झालेल्या युवकाचा मृत्यू झाला.

त्यानंतर हा मृतदेह नातेवाइकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर ठेवला.

प्रकरणातील आरोपीला जोपर्यंतअटक करण्यात येत नाही, तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही, असा पवित्रा घेतला.

शहरात या घटनेचे वृत्त पसरताच पोलीस ठाणे शहरच्या आवारात जमाव जमा झाला.

शहर पोलीस ठाण्यासमोर या जमावाने काही कळायच्या आत दगडफेक सुरू केली.

यात काही मोटारसायकल, भेळच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बदलून जीवे मारला असल्याचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक करण्याचे आश्वासन नातेवाईकांना दिले.

त्यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्यात आला.

या घटनेचे वृत्त कळताच शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

चौबारा रोड, हनुमान कट्टा, मुक्कावर चौक, भाजी मार्केट परिसर, नगरपालिका, छ.शिवाजी चौक, मोंढा रोड, देगलूर रोड या भागातील अनेक व्यापाऱ्यांनी आपले दुकान तात्काळ बंद केले.

यादरम्यान तातडीने उदगीरात दाखल झालेले अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी कुठल्याही अफवेला बळी न पडता नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here