पुणे : जसंजसं नवीन वर्ष जवळ येत आहे, तसतशी कोरोना लशीबाबत (corona vaccine) उत्सुकता अधिक वाढली आहे. कोरोना लसीकरणासाठी पुण्यातील लस उत्पादक कंपनीही सज्ज झाली आहे.
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, अस्ट्राझेनका कंपनी आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेली कोव्हिशिल्ड (Covishield) ही कोरोना लस. या लशीचे 40-50 दशलक्ष डोस तयार आहेत, अशी माहिती सीरमचे सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी दिली आहे.
आम्ही तयार केलेल्या लशीच्या प्रभावाबाबत Astra Zeneca च्या सीईओंनी आधी माहिती दिली आहे. ही लस 95% प्रभावी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. लवकरच हा अहवालही आम्ही जारी करणार आहोत.
सरकारकडून काही दिवसांत परवानगी मिळेल आणि त्यानंतर आम्ही लस पुरवठा करू, असं पूनावाला यांनी सांगितलं. या लशीच्या आपात्कालीन वापरासाठी केंद्र सरकारकडे अर्ज करण्यात आला आहे. कोरोना लशीचे 40-50 दशलक्ष डोस तयार आहेत.
आता फक्त प्रतीक्षा आहे ती मोदी सरकारच्या निर्णयाची. आपण कोरोना लसीकरणासाठी तयार आहोत. आपल्याकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे. अशी घोषणा कोरोना लस तयार करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं केली आहे.
आमच्याकडून किती डोस घ्यायचे आणि किती वेगानं लशीकरण मोहीम सुरू करायची याचा निर्णय आता सरकार घेईल. जुलै 2021 पर्यंत आम्ही जवळपास 300 दशलक्ष डोस उपलब्ध करून देणार आहोत. असंही पूनावाला यांनी ANI शी बोलताना सांगितलं.
भारतात कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता पुढील महिन्यापासूनच नागरिकांना लस देण्याचा सरकारचा मानस आहे. भारताच्या सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने सुरुवातीला 9 डिसेंबर रोजी तीन अर्जांचा आढावा घेतला.
आढावा घेतल्यानंतर सीडीएससीओने अॅस्ट्रॅजेनेका शॉट्स तयार करणार्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) सह सर्व कंपन्यांकडून अधिक माहिती मागितली. त्यामुळे कदाचित याच आठवड्यात सरकार या लशीला मंजुरी देण्याची शक्यता आहे, असं सांगितलं जातं आहे.