राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पूर्वीपासून एक नेता, एक पद अशी संकल्पना विचाराधीन आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे विधानसभेतील गटनेते, प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री अशी तीन पदे आहेत.
त्यामुळे कोणत्याही एका पदाला योग्य पद्धतीने न्याय देता येत नाही, असे काहींचे म्हणणे होते.
कोरोना संसर्ग कमी झाल्याने आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.
त्यामुळे आता जबाबदारीचे विभाजन करावे का? याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जबाबदारीचे विभाजन होईल की नाही? हे माहिती नाही.
काँग्रेस नेते राहुल गांधी येताच चार ते पाच दिवसात जबाबदारीत बदल होणार की नाही?
हे समोर येईल, असे स्पष्ट संकेत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.
पत्रकार दिनानिमित्त कराडमध्ये अनौपचारिक गप्पा मारताना आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी आपली मते व्यक्त केली.
महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर मला विधानसभा सभापती पदाबाबत विचारणा करण्यात आली होती.
सक्रिय राजकारण आणि विधानसभा मतदारसंघाला जास्त वेळ देता आला नसता, याचा विचार करून आपण सभापतीपद नाकारले होते.
त्यामुळे आपणास सभापतीपदात रस नसल्याचेच अप्रत्यक्षरित्या आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
एक नेता, एक पद याबाबत काँग्रेसमध्ये पूर्वीपासून विचार सुरू आहे.
पक्षश्रेष्ठींच्या विचारानुसार आता याबाबत विचार सुरू झाला आहे.
काँग्रेसचे राज्य प्रभारी एच. के. पाटील यांनी याबाबत आमदारांची मते जाणून घेतली आहेत.
त्यामुळे आता सुरु असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत ठोस निर्णय होईल की नाही.
हे आपणास माहिती नाही. पक्षश्रेष्ठी याबाबत निर्णय घेतील आणि काही दिवसात चित्र स्पष्ट होईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.