कोरोना रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी रेमेडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. मात्र, हा काळाबाजार रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.
रेमेडिसिवरची मागणी व काळाबाजार याचे मोठे रॅकेट काम करीत असल्याची खंत एका डॉक्टरांनीचं व्यक्त केली आहे. कारण सरकारने याकडे लक्ष न दिल्याने काही जणांनी याचा साठा केला व दुसरी लाट आल्यावर त्याचा काळाबाजार करीत आहेत.
खरे तर रेमेडिसिवर वापरण्याची पध्दत आहे. याउलट खाजगी रुग्णालयात त्याचा बिनबोभाट वापर सुरू आहे. साधारणपणे 45 च्या पुढे वय, स्कोर 12+ असले, शुगर व हृदयरोग असेल आणि आवश्यक असेल तरच रेमेडिसिवरचा विचार करण्यात येतो.
काही प्रकरणात नातेवाईकचं जास्त रेमेडिसिवरचा हट्ट करू लागले आहेत. त्यामुळे काळाबाजार करणारे पुढे आले आहेत. काही रुग्णालयातील कर्मचारी रेमडेसिव्हिर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन कसे देत आहे, याचा विचार प्रशासनाकडून का केला जात नाही.
रुग्णालयातील कर्मचारी थेट ‘आम्ही ब्लॅकमध्ये रेमेडेसिव्हिर मिळवली, तुम्हाला हवी असल्यास २०-२५ हजारात एक इंजेक्शन पडेल’ असे सांगतो, हा पैसा आणायचा कुठून? गरीबांनी मरायचे का? हा सवाल गरीबांचा आहे.
सरकारने रेमेडिसिवर विक्रीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी. त्यासाठी जिल्हा पातळीवर कमिटी नेमावी आणि विक्री व वितरण सुरळीत करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.