लातूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील समाज कल्याण अधिकारी आहेत नागेश खमितकर यांनी एका संस्थेतील अनुकंपातत्वावर नोकरीसाठीचे नियुक्तीपत्र देण्यासाठी एका तरुणीस चक्क शरीरसुखाची मागणी केली आहे.
यामुळे संतप्त झालेल्या तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पीडित तरुणीचे वडील लातूर येथील एका संस्थेत नोकरी करत होते. त्यांचा मृत्यू झाला. यामुळे सदरील तरुणी ही वडिलांच्या जागेवर अनुकंपातत्वावर या ठिकाणी नोकरी मागत होती.
सदर प्रकरणाची कागदपत्रेही तिने दाखल केली आहेत. याबाबत लवकरच तुझे नियुक्तीपत्र काढतो. मात्र, त्याबदल्यात शरीर सुखाची मागणी पूर्ण करावी लागेल असा प्रस्ताव नागेश खमितकर यांनी तरुणी समोर ठेवला.
यामुळे त्या तरुणीने तात्काळ याची तक्रार लातूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पालकमंत्री यांच्याकडे केली. पोलिसांनी तपास केल्यावर याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.