मुंबई : ओबीसींची जातनिहाय जनगणना करा ही मागणी करून थेट भाजपाच्या अजेंड्याला आव्हान देण्याचे काम पुन्हा ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे.
दिवंगत पिता गोपीनाथ मुंडे यांच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.
पंकजाताई यांनी थेट देशातील जनगणना जातनिहाय करण्याची मागणी केली आहे.
मात्र, केंद्रातील भाजप सरकारचा यास विरोध असल्याने यामुळे त्याचाच पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पंकजा मुंडे यांनी यावर्षी सन २०२१ मध्ये होणारी देशातील जनगणना जातनिहाय व्हावी अशी मागणी केली आहे.
मात्र, जातनिहाय जनगणना केंद्रातील भाजपप्रणीत ‘एनडीए’ सरकारला अडचणीत आणणारी असल्याने पंकजा यांच्या मागणीचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
देशात काँग्रेसप्रणीत ‘यूपीए’ सरकार असताना गोपीनाथ मुंडे जातवार जनगणनेची मागणी सातत्याने करत होते.
त्यासंदर्भातली व्हिडीओ पंकजाताई यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
हम भी इस देश के है हमारी भी गिनती करो .. ओबीसी जनगणना की आवश्यकता और अपरिहार्यता है ..कुछ यादे और कुछ वादे https://t.co/2yQi1fBgw0
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 24, 2021
‘२०२१ ची जनगणना जातनिहाय होणे आवश्यक आहे. त्या मागणीचा गावागावातून निघालेला आवाज राजधानीपर्यंत पोहोचले याविषयी माझ्या मनात संदेह नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे.
देशातील ओबीसींची संख्या सरकार दप्तरी निश्चित नाही.
ओबीसींना शिक्षण व नोकरीत फक्त १९ टक्के आरक्षण आहे.
त्याचवेळी या वर्गाची देशातील संख्या ५५ टक्के असल्याचे मानले जाते.
त्यामुळे जिथे भाजप विरोधकांची सरकारे आहेत त्या राज्यांमधून जातनिहाय जनगणनेची मागणी होत आहे.
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी, बिहारमध्ये जनता दल तर, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने त्यासाठी आग्रह धरला आहे.
महाराष्ट्र सरकारने तर आपल्या पहिल्याच अधिवेशनात पहिला ठराव जातनिहाय जनगणनेच्या मागणीचा मंजूर केला होता.
त्यामुळे भाजप यावर कोणती प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.