सोलापूर : आमची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यामुळे आम्ही कोणी रस्त्यावर तडफडून मरणार नाही. मात्र आम्हाला सामान्य जनतेच्या सुरक्षिततेची काळजी वाटते.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात करताना सरकारने त्यांच्याकडील बुलेटप्रूफ मोटारही काढून घेतली.
हा संपूर्ण राजकीय निर्णय असून यामागे सरकारची केवळ सूडभावना दिसून येते, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.
सोलापुरात रविवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी फडणवीस व इतर नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केल्याबद्दल आगपाखड केली.
फडणवीस यांना नक्षलवाद्यंपासून धोका असल्याचा पोलिसांचा अहवाल आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा व्यवस्था कमी न करता आणखी वाढवावी, अशी शिफारस तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांनी केली होती.
एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला सुरक्षा व्यवस्था देताना पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून त्याबाबत आढावा घेतला जातो. यात योग्यता असेल तरच संबंधित व्यक्तीला सरकारकडून सुरक्षा व्यवस्था दिली जाते.
त्यानंतर वेळोवेळी समितीकडून फेरआढावा घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीची सुरक्षा व्यवस्था कमी करायची की नाही याचा सरकारकडून निर्णय घेतला जातो.
परंतु फडणवीस व इतरांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करताना सरकारने समितीच्या शिफारशी डावलल्या आहेत. तथापि, त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचे नाही.
आम्हाला नेत्यांच्या सुरक्षेपेक्षा राज्यातील सामान्य जनतेच्या सुरक्षेची अधिक काळजी वाटते. रुग्णालयात आगीची दुर्घटना घडून नवजात बालके मृत्युमुखी पडतात.
महिलांवर अत्याचार वाढतात. हत्यांचे प्रकार घडतच राहतात. त्यामुळे सामान्य जनतेची सुरक्षा आमच्यासाठी काळजीचा विषय असल्याचे दरेकर यांनी नमूद केले.