धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप होताच, समाजातील सगळ्यांनी रामअवतार धारण केला आहे. समाजातील सगळे रामअवतार सोशल मिडीयावर येवून सामाजिक न्याय तो हाच का? असा प्रश्न विचारत आहेत.
एखाद्याची चुक झाली की, तातडीने त्याला शिक्षा सुनावणारी स्वयंघोषित न्यायदान करणारी टोळी सोशल मिडीयावर उच्छाद घालत आहे. धनंजय मुंडे यांनी जे केले तो त्यांचा वैयक्तिक मामला आहे.
त्यांनी का केला? कशासाठी केला? कोणासोबत केला? केला तर आम्हाला का सांगितला नाही? हे सारे प्रश्न बिनकामी व बिनबुडाचे आहेत. जवळपास 20 वर्षापासून त्यांचे संबंध आहेत, असे स्वतः मुंडे यांनी जाहीरपणे कबुल केले आहे.
त्यांनी त्यांचे खाजगी जीवन समाजापासून लपवून ठेवले आणि त्यांच्या कूटूंबाने स्विकारले असेल तर आपण चर्चा व चिंता करण्याचे कारण काय? त्यांच्या मतदारसंघातही या नात्याची कुणकूण कोणाला नसेल, त्यांच्या घरच्यांना याची माहिती नसेल असे होत नाही.
सामाजिक जीवनात वावरणार्या माणसाने आदर्श वागले पाहीजे, ही अपेक्षा रास्त आहे. राजकारण्यांनी आदर्श वागलेच पाहीजे. फक्त हा नियम राजकारण्यांना लागू होतो का? आपल्या समाजातील बाकीच्यांना हा नियम लागू होत नाही का?
देशाच्या माननीय सुप्रीम कोर्टाने लिव्ह इन रिलेशनला कायदेशीर मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरात कार्पोरेट, बॉलीवुड, हायप्रोफाइल जगातच नाही तर छोट्या कॉलनीतही कोणी या नात्याकडे आता आश्चर्याने पहात नाही.
लिव इन रिलेशन जाहीरपणे सोशल मिडीयावर पोस्ट केले जाते. आपले नाते कसे होते, आज काय स्थिती आहे हे मुंडे यांनी जाहीर केले आहे, याचा अर्थ आपण त्याचा बाजार मांडावा असा होत नाही.
महाविद्यालयात शिकणारी, आयटी क्षेत्रात वावरणारी अनेक जोडपी उघड राहतात. जेव्हा ब्रेकअप होतो, तेव्हा सोशल मिडीयावर येवून स्वतः सांगतात.
त्यामुळे धनंजय मुंडे राज्याचे मंत्री आहेत. त्यांनी आदर्श रामासारखे वागले पाहीजे हा अट्टाहास व्यर्थ आहे. त्यांच्या वैक्तिक खाजगी जीवनाशी आपले काही देणेघेणे नाही व नसावे.
काही वर्षापूर्वी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्याही नावाची अण्णा हजारे यांच्यामुळे चर्चा झाली, तेव्हा गोपीनाथ मुंंडे धनंजय मुंडे यांच्या सारखे उमेदीत होते.
त्यांचेही राजकारण बहरत होते. तेव्हा अण्णांनी बरखा प्रकरण बाहेर काढून गोपीनाथ मुंंडेचे राजकारण अडचणीत आणले होते. तेव्हा त्यांना फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी भक्कम साथ दिली होती.
त्यामुळे राजकारणात वावरणार्या माणसाच्या खाजगी जीवनाची चर्चा करण्याची हौस आहे. अलिकडे काही जणांनी तर सीडी सेंटर सुरु करुन आपले राजकारणच सीडी लावू का म्हणून जीवंत ठेवले आहे.
भाजपा सोडून राष्ट्रवादीत जाताना तर एकनाथ खडसे यांनी थेट लावू का सीडी अशी धमकीच दिली आहे. त्यामुळे राजकारण्याच्या सीडीचे आता कोणाला आकर्षण उरले नाही.
धनंजय मुंडे प्रकरणाने पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडे यांचे नाव आणि खाजगी जीवन चर्चेत आणले आहे. किमान धनंजय मुंडे यांनी आपले नाते व चूक खुल्या मनाने कबूल केली आहे.
बाकीच्या नेत्यांचे कांड आणि प्रकरण सर्वांनाच ठावूक आहेत. जर सगळ्यांचे कांड बाहेर आले तर राजकारणाचे पिवळे पुस्तक तयार होईल.
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणार्या पिडीत महिलेचे सोशल मिडीया अकांऊट पाहिले तर लक्षात येईल, धनंजय मुंडे यांच्याशी असलेले नाते सांगताना किती आनंद व गर्व व्यक्त केला आहे.
प्रत्येक वेळी रेणू शर्मा हॅशटॅग करुणा धनंजय मुंडे अशी ओळख करुन दिली आहे. सोशल मिडीयावर आपले नाते दोन दिवस आड जाहीर केले आहे.
मुंडे व शर्मा नाते का निर्माण झाले? कशासाठी निर्माण झाले? या नात्यामुळे कोणाचा फायदा झाला? कोणाचे नुकसान झाले? फक्त मुंडे आणि शर्मा कुटूंबच सांगु शकते. तेव्हा पिडीतेवर किती अन्याय झाला हा प्रश्न करण्याचा आपल्याला अधिकार नाही.
धनंजय मुंडे यांच्या पत्नींनी तक्रार केली नाही. त्यांनी हे नाते स्विकारले आहे. त्यांच्या दुसर्या पत्नी (कायदेशीर मान्यता नसली तरी) करुणा धनंजय मुुंडे यांनी तक्रार केली नाही, त्यांनीही धनंजय मुंडे यांना गुणदोषासकट स्विकारल्याचे सोशल मिडीयावरील पोस्टवरुन तरी दिसत आहे.
जेव्हा धनंजय मुंडे यांनी अनैसर्गिक संबंध ठेवले तेव्हा धाकट्या बहिणीने मोठ्या बहिणीकडे तक्रार का केली नाही? जर तक्रार केली तर मोठ्या बहिणीने तेव्हाच का तक्रार करायला लावली नाही?
हा सारा मामला त्यांच्या राजीखुशीचा होता की जबरदस्तीचा होता हे त्या तिघांनाच ठावूक आहे. त्यातील एक धनंजय मुंडे यांनी या नात्याची एक बाजू सोशल मिडीयावर मांडली आहे.
एखाद्याचे खाजगी जीवन सोशल मिडीयावर उधळून लावतांना त्यांच्या मुलांची, कुटूंबियांची मनोदशा काय होत असेल? याचा आपण एकदा विचार करण्याची गरज आहे.
धनंजय मुंडे भाजपात होते, आज राष्ट्रवादीत आहेत. उद्या कदाचित परत भाजपात येतील. फक्त मुंडे आज राष्ट्रवादीत आहेत म्हणून एवढा जाहीर पंचनामा मांडणार का?
कदाचित धनंजय मुुंडे यांचे या प्रकरणात राजकारण व राजकीय करिअर संपून जाईल, समजा संपले तरी धनंजय मुंडे यांना काही फरक पडेल का? उद्या नवीन प्रकरण समोर येईल.
पक्ष पाहून चुकीची तीव्रता ठरणार का? धनंजय मुंडे फक्त राष्ट्रवादीचे नेते आहेत म्हणून झोडपले जात असेल तर इतर पक्षात असे बनेल व रंगेल नेते नाहीत का?
शशी थरुर, दिग्विजय सिंग, एनडी तिवारी असे राजकीय आयडॉल राजकारणात उजळ माथ्याने वावरत आहेत. भाजपा समर्थकांना कदाचित धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्यात आनंद होत असेल पण मुंडे यांचे हे प्रकरण शेवटचे असेल याची खात्री आहे का?
धनंजय मुंडे यांना माफ करावे, त्यांच्या चुकीला पाठीशी घालावे ही अपेक्षा नाही. पिडीतेवर खराच अन्याय झाला असेल तर कठोरात कठोर शिक्षा मुंडे यांना झाली पाहीजे.
फक्त सवंग कारणासाठी आरोप केले जात असतील तर त्याची सखोल चौकशी झाली पाहीजे. आरोप करुन राजकीय व सामाजिक आयुष्य कोणाचेही उध्दवस्त होता कामा नये.
आपला स्वार्थ साधण्यासाठी जवळीक साधायची. कोणत्याही थराला जावून हवे ते मिळावयचे, मिळाले नाही तर मी टू चा आरोप करायचा हे सारेच समाजमनाला सुन्न करणारे आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर ज्या पध्दतीने टिका केली जात आहे. त्याची चौकशी झालीच पाहीजे, जर मुंडे खरेच गुन्हेगार असतील तर कायद्यापेक्षा अधिक कठोर शिक्षा झाली पाहीजे.
सोशल मिडीयावरील ट्रायल जरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी एखाद्याचे खाजगी आयुष्य अभिव्यक्ती स्वातंत्र्यात येत नाही. खाजगी आयुष्यात अनेक पैलू असतात.
अनेक पदर असतात. त्या प्रत्येक पैलूचा विचार होण्याची आणि त्यावर व्यक्त होण्याची गरज आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक्यासारखा वापर होता कामा नये.
– विनोद मिंचे