धनंजय मुंडे अखेर शरद पवारांच्या भेटीला | मुंडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

257

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना दुसऱ्या विवाहाचं प्रकरण चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आहे. 

धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात आपल्या दुसऱ्या विवाहाची माहिती लपविल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबतची थेट लेखी तक्रारच केली आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या तक्रारीवर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात पाच अतिशय महत्वाचे मुद्दे नमूद करत धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत.

“धनंजय मुंडे यांनी दुसरं लग्न केल्याचं सार्वजनिकरित्या मान्य केलं आहे. दुसऱ्या पत्नीची आणि त्यांच्या मुलांची काळजी घेत असल्याचंही त्यांनी कबुल केलं आहे. याशिवाय, त्यांची दुसरी पत्नी असलेल्या रेणू शर्मा मुंबई पोलिसांकडे मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार देखील केली आहे”, असं किरीट सोमय्या यांनी पत्रात नमूद केलं आहे.

धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्यासाठी मुंबईत फ्लॅट घेऊन दिल्याचंही मान्य केलंय. शिवाय रेणू शर्मा यांच्या मुलांना आपलं नाव दिल्याचीही कबुली त्यांनी दिली आहे.

ऑक्टोबर २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी धनंयज मुंडे यांनी आपल्या शपथपत्रात दुसऱ्या विवाहाची माहिती लपवली होती.

त्यामुळे या प्रकरणाची दखल घेऊन आपण योग्य ती कारवाई करावी, असं किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

पक्षाने कारवाई करावी : फडणवीस

धनंजय मुंडे यांनी स्वतः फेसबुक पोस्टवर कबुली दिली आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांच्या पक्षाने याचा विचार केला पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.

दरम्यान, त्यांनी यावेळी आघाडी सरकारवर टीका केली. प्रत्येकवेळी केंद्रावर आरोप करायचे आणि आपला नाकर्तेपणा लपवायचा अशी राज्यसरकारची भूमिका आहे.

यावेळी राज्य सरकारचे डुप्लीकेट काम चालले आहे, अशी टीका केली. ट्विटमध्ये संभाजीनगर म्हणायचे आणि निर्णय घेण्याचा अधिकार असूनही तो घ्यायचा नाही.

महाविकास आघाडी सरकारची मिलीजुली चालढकल आहे. कार्यकर्ते येत जात राहतात, सगळेच पक्ष हे करतात, असे फडणवीस म्हणाले.

मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही : चंद्रकांत पाटील

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेले लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.

या संदर्भात त्यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली असून त्यांनी हे आपले ट्विट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही टॅग केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्याबद्दल तत्काळ राजीनामा द्यायला हवा.

मुंडे यांच्यावरील शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही, असा निशाणा त्यांनी साधला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here