या आजारात होणार त्रास मी अनुभवला असून त्यादृष्टीने काळजी घेण्याचा सल्लाही धनंजय मुंडे यांनी पंकजाताईंना दिला आहे.
बीडच्या राजकारणावर पकड मिळवण्यासाठी या मुंडे भावा-बहिणीत नेहमीच स्पर्धा सुरू असते. पंकजा आणि धनंयज मुंडे यांचं राजकीय वैर अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे.
मात्र, मंगळवारी पंकजा मुंडे आजारी असल्याचं कळताच धनंजय मुंडे यांनी रक्ताच्या नात्याला साद घालणारे ट्विट करून त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला.
पदवीधर विधानसभा निवडणुकीच्या ऐन एकदिवस आधी, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची तब्येत अचानक खराब झाली. पंकजा मुंडे यांनी स्वत: ट्विटर तशी माहिती दिली.
“पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरिषजी बोराळकर यांना पहिल्या पसंदीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी खोकला व ताप आहे, त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून isolate झाले आहे.
अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी,” अशी माहिती पंकजा मुंडे यांनी ट्विट करून दिली.
पंकजा मुंडे यांची तब्येत बरी नसल्याचं कळल्यानंतर, त्यांचे भाऊ आणि महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना ट्विटरवर त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला.
“पंकजाताई मी स्वतः कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये; कोरोनाविषयक सर्व चाचण्या करून घे. स्वतःची व घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे,” अशी भावनीक साद सुद्धा त्यांनी पंकजा यांना घातली आहे.
फोनवर केली चर्चा
त्यानंतर धनंजय मुंडे यांनी फोन करून देखील पंकजा यांच्या तब्येतीची विचारपुस केली आहे. जून महिन्यात धनंजय मुंडे हे कोरोना विषाणूचा सामना करून, त्यावर मात करून परत आलेत.
पंकजा मुंडे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी मराठवाड्यात आल्या होत्या. प्रचारादरम्यान त्यांना सर्दी, खोकला आणि ताप आल्याने त्या मुंबईला परतल्या. त्या होम आयसोलाटेड आहेत.
“पंकजा मुंडे यांनी कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्याबाबतच्या सर्व चाचण्या करून घ्याव्यात, स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी आणि लवकर बऱ्या व्हावं,” असा सल्ला धनंजय मुंडे यांनी फोनवरून दिला आहे.