बीड : सध्या बलात्काराच्या आरोपांमुळं चर्चेत असलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपली पकड कायम असल्याचे दाखवून दिले आहे.
मतदारसंघातील परळी व अंबाजोगाई तालुक्यातील एकूण 12 ग्रामपंचायतींची या पहिल्या टप्प्यात निवडणूक होती. त्यापैकी 10 ग्रामपंचायतीत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे.
उर्वरित 2 ठिकाणी संमिश्र निकाल आले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. परळी तालुक्यातील रेवली व वंजारवाडी या दोन तर अंबाजोगाई तालुक्यातील मूर्ती, वाकडी व हनुमंतवाडी या 3 अशा एकूण 5 ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या होत्या.
अंबाजोगाई तालुक्यातील एकूण 5 पैकी मूर्ती, वाकडी व हनुमंतवाडी या तीन ग्रामपंचायती बिनविरोध राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या असून अंबलवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचेच दोन्ही पॅनल विजयी झाले आहेत. तर दत्तपूर 7 पैकी 2 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत.
उर्वरित गावांमधील निवडणुकीत परळी तालुक्यातील लाडझरी, मोहा, गडदेवाडी, सरफराजपुर या 4 गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली असून भोपळा ही एकमात्र ग्रामपंचायत प्रा.टी. पी.मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपला राखण्यात यश आले आहे.
तर पॅनल महत्वाचं ..!
ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हटलं की गावगाड्यातला मोठा उत्साह असतो. मात्र या निवडणुकांमध्ये स्थानीय लेव्हलवरचं राजकारण हे अनेकदा विकोपाला गेलेलं पाहायला मिळते.
बहुतांश गावं दोन पॅनलमध्ये विभागलेली असतात. काही गावांमध्ये तर एकाच नेत्याच्या किंवा पक्षांचे दोन पॅनल असतात. सांगायचा उद्देश हा की, ग्रामपंचायत निवडणुका या पार्टीच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत तर पॅनल निहाय लढवल्या जातात.
जे उमेदवार आज अमक्या नेत्याच्या गटाचे म्हणून सांगितले जातात ते विरुद्ध पार्टीचेही असू शकतात. त्यामुळं नेत्यांनी किंवा पक्षांनी आम्हाला इतक्या जागा मिळाल्या, असं सांगितलेलं अनेकदा खरं असेलच असं नाही.