राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप होत असतानाच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस एकापाठोपाठ एक अशा दोन प्रकरणात अडकल्याने राष्ट्रवादीवर राजकीय संक्रात ओढावल्याचे बोलले जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे यांचे काही व्यक्तींशी संंबंध होते. त्यावरुन मुंडे यांच्याविरोधात काही तक्रारी करण्यात आल्या. हे प्रकरण या दिशेने जाईल, असा अंदाज धनंजय मुंडे यांना होती.
त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच उच्च न्यायालयात धाव घेत आदेश प्राप्त करुन घेतला होता. त्यामुळे आता याप्रकरणात फारसे बोलण्यासारखे काहीही नाही, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. त्यांनी माझी बुधवारी भेट घेतली आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. तसेच, या प्रकरणावर स्पष्टीकरणही दिले आहे. मला दिलेली माहिती मी पक्षासमोर मांडेन.
संघटनेच्या प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन आणि चर्चा करून लवकरच याबाबत निर्णय घेऊ, असेही शरद पवार यांनी सांगितले.
नवाब मलिक यांच्याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले
नवाब मलिक हे राज्यातील महत्त्वाच्या मंत्र्यांपैकी एक आहेत. २५ वर्षांहून अधिक काळ ते विधिमंडळात आहेत. या काळात त्यांच्यावर एकदाही कोणतेही स्वरुपाचे आरोप झालेले नसून त्यांच्या नातेवाईकावर आरोप झाले आहेत.
त्या नातेवाईकाला संबंधित यंत्रणेने अटक केली आहे. या प्रकरणात आम्ही संबंधित यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करू. आता एनसीबीने वस्तुस्थिती समोर आणणे गरजेचे आहे. तेव्हा आता एनसीबी योग्यप्रकारे काम करेल, अशी आशाही शरद पवार यांनी व्यक्त केली.