शिर्डीतून बेपत्ता झालेली इंदूरची महिला प्रियकरासोबत निघून गेल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
सदर माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. सदर महिला ही तिच्या प्रियकरासोबत फरार झाली होती आणि मिळून आल्यावर स्मृतीभंश झाल्याचे नाटक देखील करीत होती.
मात्र अखेर सत्य समोर आले आणि या निमित्ताने देवस्थांनबद्दल देखील येत असलेल्या उलट सुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला.
साडेतीन वर्षांपूर्वी इंदूर येथील महिला आपल्या पती व मुलासोबत शिर्डी येथे साई दर्शनाला आली होती. दर्शनानंतर बाजारपेठेतून ती बेपत्ता झाली तशी तक्रार तिच्या पतीने शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
या प्रकरणाचा तपास शिर्डी पोलीस योग्य पद्धतीने करत नसल्याच्या भावनेतून तिच्या पतीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.
याप्रकरणी न्यायालयाने शिर्डी पोलीस आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त केली होती तसेच सदर प्रकरणामागे मानवी तस्करी अथवा अवयव चोरीचे रॅकेट कार्यरत आहे का ? याचा तपास करण्याचे देखील पोलिसांना निर्देश दिले होते.
गेल्या पंधरवड्यात 17 डिसेंबर रोजी ही महिला इंदूरमध्ये सापडली इतके दिवस ती कुठे होती याबाबत ती काहीही बोलत नव्हती तसेच भ्रमित अवस्थेत असल्याचे भासवत होती मात्र अखेर पोलिसांना तिच्याकडून माहिती काढण्यात यश आले.
काळे यांनी सांगितल्याप्रमाणे ‘ सदर महिला स्वतःहून शिर्डीतून कोपरगावला गेली आणि तिथून रेल्वेने पुण्याला तिचा प्रियकर ओमप्रकाश चंदेल त्याला जाऊन भेटली आणि तिथून ते दोघेही मध्यप्रदेशात फरार झाले होते ‘