नाराज नगरसेवक भाजपाला रामराम करणार? नवीन वर्षात भाजपमधून मोठे आऊटगोईंग

215

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी असतानाच नाराजांच्या गाठीभेटी सुरु झाल्या आहेत.

सत्ताधारी भाजपमध्ये मोठा गट नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. मागील चार वर्षात भाजपच्या तब्बल 27 नगरसेवकांना एकही पद मिळाले नाही.

त्यांची घुसमट सुरु आहे. त्यामुळे नवीन वर्षात मोठ्या प्रमाणावर आवक-जावक सुरु होण्याची शक्यता आहे. नाराज नगरसेवक भाजपला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. नाराजांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. गाठीभेटी सुरु आहेत.

महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीवेळी राज्यात भाजपचे सरकार होते. त्यामुळे भाजपने आपल्या सोईनुसार प्रभाग रचना करुन घेतल्याचा आरोप झाला.

राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांनी भाजपचे कमळ हाती घेतले. त्यामुळे औद्योगिकनगरीत परिवर्तन झाले. राष्ट्रवादीची 15 वर्षांची सत्ता जावून भाजपचे एकहाती कमळ फुलले. पण, चार वर्षात भाजपच्या कार्यपद्धतीला अनेक नगरसेवक वैतागले आहेत.

भाजपमध्ये त्यांची घुसमट सुरु आहे. भाजपमध्ये गेलेले अनेक नगरसेवक पूर्वाश्रमीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीचे आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवक-जावक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. महापालिका निवडणुकीला वर्ष भराचा कालावधी असताना भाजपमधून आऊटगोईंग सुरु होण्याचे संकेत मिळत आहे.

त्यातच प्रभाग क्रमांक 6 धावडेवस्ती, भगतवस्तीमधून बिनविरोध निवडून येत भाजपचे खाते खोलणारे नगरसेवक रवी लांडगे, प्रभाग क्रमांक 23 शिवतीर्थनगर, समर्थनगर, केशवनगरमधून अपक्ष निवडून आलेले कैलास बारणे आणि प्रभाग क्रमांक 24 दत्तनगर, थेरगाव मधून भाजपकडून निवडून आलेल्या माया बारणे यांचे पती संतोष बारणे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

या भेटी त्यांनी राष्ट्रवादीत काम करण्याची इच्छा दर्शवली. लांडगे हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. ते ‘भाजयुमो’चे शहराध्यक्षही होते. त्यांच्या सारख्या निष्ठावान कार्यकर्त्याने भाजपला सोडचिट्टी दिल्यास हा भाजपसाठी मोठा धक्का असेल, असे बोलले जात आहे.

कैलास बारणे यांनी मोदी लाटेत अपक्ष निवडून येण्याची कमाल केली. अपक्ष निवडून आलेल्या पाच नगरसेवकांचे ते गटनेते आहेत. अपक्ष आघाडी भाजपशी संलग्न आहे. त्यांच्या आघाडीतील अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप हे तर लोकसभेपासून राष्ट्रवादीसोबत आहेत.

तर, नीता पाडाळे, झामाबाई बारणे या नगरसेविकाही नाराज असल्याची चर्चा आहे. कैलास बारणे हे राष्ट्रवादीत जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यांच्या आघाडीतील नगरसेवकही हातावर घड्याळ बांधणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

2012 मध्ये राष्ट्रवादीकडून आणि 2017 मध्ये भाजपकडून माया बारणे निवडून आल्या आहेत. त्यांचे पती संतोष बारणे पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत. संतोष यांनीही अजितदादांची भेट घेतली असून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत.

मागील चार वर्षात एकही पद न मिळालेले 27 नगरसेवकही हळूहळू राष्ट्रवादीच्या संपर्कात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नवीन वर्षात भाजपमधून मोठे आऊटगोईंग होणार असल्याचा दावा राष्ट्रवादी नेत्यांकडून केला जात आहे.

याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, तो होवू शकला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here