जेष्ठ नेते शरद पवार सगळ्यांना आवडतात असे नाही. राजकारणी म्हणून चलाख, धूर्त, कपटी जे काय असतील ते आहेत. त्यांना आता बदलणे शक्य नाही. ते बदलणार देखील नाहीत.
याचा अर्थ असा होत नाही की, त्यांच्या आजारी पडण्याने आपण आनंदोत्सव साजरा करावा. मागील दोन दिवसांत ज्या पोस्ट पाहिल्या त्या क्लेशदायक होत्या.
पेढे वाटतो, वाकडं गेलं का? सोशल मीडियावर लोक काय काय बोलत आहेत. समजा आपल्या बद्दल, आपल्या आई वडिलांबद्दल असं कोणी बोललं तर खरेच आवडेल का?
शरद पवार आता थकले आहेत. कर्करोगासारखा आजार झाल्याने त्यांच्या बोलण्यावर मर्यादा आलीय, चेहेरा बिघडला आहे, ते काही टिंगल करण्याची गोष्ट नाही. सर्व आजार व मर्यादा बाजूला सारून जे ‘राजकारण’ करतात ते अजब आहे.
महाराष्ट्र पिंजून काढला, पूर्ण निवडणूक एकहाती लढवली, राज्याचे राजकारण मनासारखे फिरवले. सरकार बनवले व उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. यातून खरे तर खूप शिकण्यासारखे आहे.
आपण धडधाकट असून फक्त शिव्या देत बसलोय. आजही हजारो कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करतात हे कमी नाही. आजार काय कोणालाही होऊ शकतात. त्याबद्दल संस्कार व संस्कृती विसरून ‘कमेंट’ करणे माणूसकीचे लक्षण नक्की नाही.
अमित शहा, नरेंद्र मोदी, योगी, सुषमा स्वराज यांच्या बद्दल बोलले म्हणून आपणही त्याचं भाषेत बोलून वाईट चिंतणार का? शरद पवार यांच्या मृत्यूबद्दल आपण का बोलायचे? कशासाठी बोलायचे?
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया। म्हणून सगळ्यांच्या सुखाची प्रार्थना करणाऱ्या हिंदू संस्कृतीला आपण विसरत आहोत का?
मतभेद आहेत, नक्की असावेत. पक्ष वेगळे आहेत, नक्की आहेत. विचार पटत नाहीत, म्हणून चक्क मरणाची कामना करावी एवढे आपण राजकीय स्वार्थी झालो का?
मृत्यू अंतिम सत्य आहे, ते कोणाला टाळता येत नाही. एखाद्याच्या जाण्याने आपलं काही जात नाही, त्या कुटुंबाचं सर्वस्व हरवत असते. राजकिय विरोध करावा, पण व्यक्ती द्वेष करू नये.
शरद पवार आजारी आहेत, ते बरे व्हावेत. शत्रूचे देखील वाईट न चिंतणारी आपली संस्कृती आहे. उगाच मनाला व तोंडाला येईल ते बोलू नका. त्यांना दीर्घायुष्य लाभावे हीच मनोमन श्री रामाकडे प्रार्थना!