आगरतळा : कोरोना काळात अधिकारी मनमानी करीत असल्याचे समोर येऊ लागले आहे. सध्या देशभर त्रिपुरा मधील लग्न व जिल्हाधिकारी यांची दबंगगिरी चर्चा सुरु आहे. लग्न समारंभात कोव्हिडसंबंधी नियमांचे उल्लंघन केल्याने वऱ्हाडींची वरात काढणाऱ्या कलेक्टरचं निलंबन करण्यात आले आहे.
त्रिपुरातील आगरतळ्याचे जिल्हाधिकारी डॉ.शैलेश यादव (Dr.DM Shailesh Yadav) यांनी लग्नात घुसून वऱ्हाडींवर कारवाई केली होती. मात्र कारवाई दरम्यान वऱ्हाडींशी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
त्यानंतर मुख्यमंत्री विप्लव देव यांच्या हस्तक्षेपाने यादव यांच्यावर कारवाई करण्यात आली. आयएएस अधिकारी शैलेश यादव यांच्याविरोधात भाजप आमदारांनीही निदर्शने केली होती.
माफीनाम्यानंतरही निलंबन
पश्चिम त्रिपुरातील लग्न समारंभात जाऊन आगरतळ्याचे जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी वधू-वरासह पाहुण्यांनाही हुसकावून लावले होते.
या घटनेचा व्हिडीओ झाल्यानंतर काही जणांनी त्यांच्या दबंग कारवाईचं कौतुक केले होते, मात्र त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही केली जात होती.
त्यामुळे शैलेश यादव यांनी माफीही मागितली होती. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले होते, परंतु अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली.
एकीकडे अनेक कोरोनाग्रस्त रुग्ण आयसीयूत दाखल आहेत, तर दुसरीकडे काही मंगल कार्यालय चालक जिल्हा प्रशासनाचे नियम धुडकावून मनमानी पद्धतीने लग्न समारंभ करत असल्याचे जिल्हाधिकारी यादव यांच्या लक्षात आले.
त्यांनी पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले. मात्र, पोलीसही टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरं देत होते. त्यामुळे या लग्न सोहळ्यांना पोलिसांचंही अभय असल्याचे त्यांच्या ध्यानात आले. त्यामुळे नागरिक आणि पोलिसांचे बेजबाबदार वर्तन पाहून संतापलेले जिल्हाधिकारी शैलेश यादव स्वतःच मैदानात उतरले.
नेमके प्रकरण काय आहे?
एका रुग्णालयातून जिल्हाधिकारी शैलेश यादव यांना आयसीयू बेडमध्ये काही तांत्रिक दोष असल्याची तक्रार आली. त्यावेळी त्यांनी स्वतः तेथे जाऊन पाहणी केली आणि त्यावर उपाययोजनांचे आदेश दिले.
आयसीयूतील रुग्णांची स्थिती पाहिल्यानंतर त्यांनी शहरातील स्थिती कशी आहे हे पाहण्याचा निर्णय घेतला. रस्त्याने जाताना त्यांना मंगल कार्यालयांमध्ये नियमांचे उल्लंघन करत लग्न सोहळे होत असताना दिसले.
रात्री 10 वाजल्यानंतर कोणतेही मंगल कार्यालय सुरु ठेवण्यास परवानगी नव्हती. तरीही ही मंगल कार्यालये सुरुच होती. शिवाय कमी लोकांना परवानगी असताना लग्नात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. अनेक जणांनी मास्कही घातलेला नव्हता.
एकूणच कायद्याचं उल्लंघन आणि त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका हे सर्व पाहून संतापलेल्या जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी स्वतः मंगल कार्यालयात जाऊन कारवाईला सुरुवात केली.
मास्क न घातलेल्या वऱ्हाडींना थेट दंडुक्याचा प्रसाद देण्यात आला, तर नियम तोडूनही आम्ही काहीच चुकीचे केले नाही असे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थेट अटक करण्यात आली.