डॉ. शीतल आमटे यांनी कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरून आत्महत्या केली ?

180

आत्महत्येपूर्वी कुत्र्यांना देण्यासाठी फार्मासिस्टकडून इंजेक्शन्स मागवली असल्याचं फार्मासिस्टच्या चौकशीत स्पष्ट झालं आहे.

चंद्रपूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली.

डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. अशातच पोलिसांनी केलेल्या नगपूरच्या एका फार्मासिस्टच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्येपूर्वी कुत्र्यांना देण्यासाठी फार्मासिस्टकडून इंजेक्शन्स मागवली असल्याचं फार्मासिस्टच्या चौकशीत स्पष्ट झालं आहे. तसेच यासंदर्भातील व्हॉट्सअप चॅटिंगही उपलब्ध आहे.

डॉ. शीतल आमटे यांच्याकडे 2 कुत्रे आहेत. ते काही दिवसांपासून पिसाळल्यासारखे करत होते, त्यामुळे त्यांना देण्यासाठी ही इंजेक्शन्स त्यांनी मागवली होती.

‘अनेस्थेशिया’ श्रेणीतील ही इंजेक्शन्स असून मागवलेल्या 5 इंजेक्शन्स पैकी 1 शीतल यांच्या मृतदेहाजवळ तुटलेल्या अवस्थेत आढळून आलं होतं. त्यामुळे पोलिसांनी आता या इंजेक्शनवर तपास केंद्रीत केला आहे.

डॉ. शीतल आमटे यांच्या सासू-सासऱ्यांच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ

डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्युनंतर त्यांच्या सासू-सासऱ्यांली लिहिलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. निराशेत असलेल्या मुलीला आमटे कुटुंबाने एकटे सोडल्याचा आरोप केला आहे.

सध्या ही पोस्ट डिलिट करण्यात आली आहे. मात्र शीतल यांचे पती गौतम करजगी यांनी अशी पोस्ट सुहासिनी आणि शिरीष करजगी यांनी लिहिली असल्याची बाब मान्य केली आहे.

शीतल आमटे यांच्या सासू-सासऱ्यांनी फेसबुकच्या माध्यमातून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आमटे कुटुंबाने मुला-मुलीत भेद केल्याचा दावा देखील या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

सोबतच आम्ही या पोस्टच्या माध्यमातून विचारलेल्या सर्व प्रश्नांवर ठाम असल्याचे देखील म्हटले आहे. मात्र कॅमेरावर कुठल्याही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय.

सध्या मी माध्यमांशी बोलण्याच्या स्थितीत नसल्याचे आणि आता बोलून काय फायदा अशी गौतम करजगी यांनी हतबलता देखील व्यक्त केली आहे. या फेसबुक पोस्टबाबत आमटे कुटुंबियांची प्रतिक्रिया घेण्याचे प्रयत्न सुरु आहे.

तपास योग्य दिशेने, पोलिसांची माहिती

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं.

डॉ. आमटे यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या प्रकरणी शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूच्या नेमक्या कारणाबद्दल निष्कर्ष काढता येईल अशी माहिती चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली आहे.

फॉरेन्सिक टीम या घटनेचा सखोल तपास करत आहे. आम्ही आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. जशी जशी तपासात माहिती समोर येईल आम्ही माहिती देऊ असे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे म्हणाले.

दरम्यान, सुसाईड नोट मिळाली का? घटने वेळी घरी कोण कोण होते? डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केलेली खोली आतून लॉक होती का? या महत्वाच्या प्रश्नांना पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट उत्तर दिले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here