कळंब : सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीचे आज (दि.१८) निकाल लागले विजयी उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गुलाल उधळला आणि इकडे प्रमुख पक्षाचे तालुकाध्यक्ष मात्र गोळाबेरीज करत होते.
उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र राजकीय पक्षांचा हिशोब एवढा भयंकर होता कि, निवडणूक झाली ५९ ग्रामपंचायतीची आणि पक्षांनी दावा केला ८३ जागांचा !
पक्षांनी केलेली आकडेमोड गणिताचा खेळखंडोबा असल्याचे सांगत सोशल मिडीयावर एकमेकांना ट्रोल केले जात आहे. तर एकमेकांचे विरोधक आकडेमोड कशी चुकली हे सांगत आहेत.
या गोळाबेरीज बाहेर आल्या त्यावेळी अनुक्रमे राष्ट्रवादी – 8 शिवसेना – 31, भाजप – 35, बहुजन वंचित आघाडी – 7 व सदस्य 80 काँग्रेस – 2 असे दावे केले जात आहेत.
त्यामुळे शिवसेना व भाजप मध्ये चांगलीच जुंपली असून नेटकऱ्यांना चांगलीच करमणूक झाली आहे. प्रत्यक्षात ५९ ग्रामपंचायतसाठी निवडणूक पार पडली आहे.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी शिवसेनेच्या 31 ग्रामपंचायती व महाविकास आघाडीकडे 8 असा दावा केला आहे.
भाजपचे अजित पिंगळे यांनी भाजपकडे 35 तर आणखी दोन ग्रामपंचायती आमच्या ताब्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा श्रीधर भवर यांनी 8 ग्रामपंचायतीत घड्याळाची टिकटिक झाली असल्याचे सांगितले आहे. तर 8 ग्रामपंचायतमध्ये आम्ही भाजप सोबत असल्याचा दावा केला आहे.
यामुळे सध्या तरी कळंब तालुक्यातील नेमकी आकडेवारी स्पष्ट करणे जिकिरीचे झाले आहे. ज्यांच्याकडे लिखित आले ती ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात असेच म्हणण्याची वेळ आली आहे.
शिवसेनेचे ‘अधिकृत’ पत्रक
शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी शिवसेनेच्या ताब्यात 31 ग्रामपंचायती व महाविकास आघाडीकडे 7 ग्रामपंचायती असलेले अधिकृत पत्रक काढले आहे. व आमच्या ताब्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांची स्वाक्षरी असलेले पुरावे असल्याचे पत्रकात म्हटले आहे.