मुंबई : एल्गार परिषदेत शरजील उस्मानीने केलेल्या हिंदू विरोधी भाषणावरून राजकारण तापले आहे. भाजपने आक्रमक भूमिका घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
एल्गार परिषदेच्या मुद्यावर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राज्यात कोणीही हिंदुंना येऊन काहीही बोलत आहे. राज्यात केवळ महाविकास आघाडी सरकार आहे आणि राज्यात हिंदूंना सरकार वाली नाही. सरकार काही करणार आहे की नाही? अशी टीका पाटील यांनी केली.
5 दिवस झाले तरी काही कारवाई झालेले नाही म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलं आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
-
राज्यात हिंदूंबद्दल असं बोलणाऱ्यांवर काही कारवाई का नाही? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून कोणी काहीही बोलायचं का? 5 दिवस झाले तरी काही कारवाई झालेले नाही म्हणून मी आज योगी आदित्यनाथांना पत्र लिहिलं आहे. यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे, अशी माहितीही पाटील यांनी दिली.
शरजील विरोधात एफआयआर झाला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारवाई करायला उशीर का होतोय? हिंदु समाज सोडून इतर समाजांचा विषय असता तर सामनातून अग्रलेख आला असता. आता महाविकास आघाडी असल्यामुळे राऊतांचा अग्रलेख नाही, अशी बोचरी टीका पाटील यांनी राऊत यांच्यावर केली.
फडणवीसांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
’30 जानेवारी 2021 रोजी पुणे येथे आयोजित एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारे, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधाने केली आहेत. आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन आंघोळ करतो, दुसर्या दिवशी पुन्हा हत्या करतो, अशाप्रकारची ही गंभीर विधाने आहेत’ असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे.
-
हिंदू समाजाबद्दल शरजीलने अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
‘बाहेरच्या राज्यातून एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्त्वावर शिंतोडे उडवितो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो, त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून, शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवा’ असंही फडणवीस म्हणाले होते.
शरजील उस्मानीविरोधात गुन्हा दाखल
आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, असं आक्षेपार्ह वक्तव्य शरजील याने एल्गार परिषदेत बोलताना केले होते. दरम्यान, एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य केलं होतं.
याप्रकरणी मोठी टीका झाल्यानंतर आता स्वारगेट पोलीस ठाण्यात शरजील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात गेल्या काही वर्षांपासून घेण्यात येत असलेली एल्गार परिषद ही नेहमीच वादात सापडली आहे.